- सुनील चावकेनवी दिल्ली - देशात वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल गाड्यांवर १० टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याचा कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या सियामच्या ६३ व्या वार्षिक संमेलनात गडकरी यांनी डिझेल गाड्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. २०१४ नंतर डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांची संख्या ५२ टक्के होती. आता ती संख्या १८ टक्क्यांवर आली आहे.
देशात ज्या प्रमाणात वाहन उद्योग वाढत आहे, त्या तुलनेत डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढायला नको, याचा निर्णय वाहन उत्पादकांनी आपल्याच पातळीवर घेतला पाहिजे, असे गडकरी यांनी या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यानंतर डिझेल गाड्यांवर १० टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याची शिफारस करणार असल्याचे वृत्त पसरले. पण, गडकरी यांनी असा कुठलाही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचा खुलासा ‘एक्स’ म्हणजे ट्विटरवर तातडीने केला.