ब्रिटनला जशास तसे उत्तर दिल्याने अखेर ब्रिटन सरकार (Britain Govt.) झुकले आहे. 11 ऑक्टोबरपासून कोव्हिशिल्ड (Covishield) किंवा युकेने मान्यता दिलेल्या लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांना क्वारंटाईन करण्य़ात येणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय कोव्हिशिल्डवर ब्रिटनने शंका व्यक्त केली होती. तसेच भारतीयांना सुरुवातीला प्रवेश नाकारताना नंतर विरोध झाल्यावर लस घेतलेल्यांना क्वारंटाईन करण्याचे ब्रिटनने म्हटले होते. कोव्हिशिल्ड ही लस ब्रिटननेच तयार केलेली आहे. तसेच पुण्याच्या कंपनीकडून करोडो डोसही ब्रिटनने तिकडे नेले आहेत. तरीदेखील हा दुजाभाव ब्रिटन करत होते. यामुळे टीकेची झोड उठताच ब्रिटनने कोव्हिशिल्डवर शंका नाही तर भारताच्या डिजिटल सर्टिफिकिटवर शंका व्यक्त केली होती.
यानंतर भारताने युकेहून येणाऱ्या प्रवाशाला, मुख्यत्वे युके नागरिकांना क्वारंटाईन, तीनवेळा आरटीपीसीआर टेस्ट आदी बंधनकारक केले होते. भारताकडून सडेतोड उत्तर मिळताच युकेने त्यांची भूमिका बदलली आहे. आता युके आपल्या रेड लिस्टमधून 47 देशांना वगळणार आहे. तसेच सात देशांना या यादीत ठेवणार असल्य़ाची घोषणा केली आहे.
यानंतर काहीच वेळात ब्रिटनचे उच्चायुक्त अॅलेक्स इलीस यांनी कोव्हिशिल्ड किंवा परवानगी असलेल्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांना क्वारंटाईन होणे बंद करण्यात येणार आहे, असे जाहीर केले.