पुढील वर्षात अर्थात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. एकीकडे भाजप, म्हणजेच भारतीय जनता पक्ष सलग तिसऱ्यांदा संपूर्ण बहुमतासह आगामी लोकसभानिवडणूक जिंकून केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. तर दुसरीकडे, विरोधी पक्ष कोणत्याही परिस्थितीत भाजपचा विजयी रथ रोखण्याच्या प्रयत्नात आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप राम मंदिर आणि हिंदत्व यांसारख्या मुद्द्यांवर निवडणूक लढू शकते. तर काँग्रेससह विरोधी पक्ष बेरोजगारी आणि जातीय गणनेसारखे मुद्दे उपस्थित करून भाजपला शह देऊ शकतात. यातच, एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात केलेला पहिला ओपिनियन पोल समोर आला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी कोणता मुद्दा ठरणार भारी? -2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कोणता असेल? असा प्रश्न या सर्व्हेक्षणात विचारण्यात आला होता. याला उत्तर देत 29 टक्के लोकांनी म्हटले आहे की, या निवडणुकीत राम मंदिर हा सर्वात मोठा मुद्दा ठरू शकतो. तर 41 टक्के लोकांनी बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा ठरू शकतो असे म्हटले आहे. याशिवाय, 10 टक्के लोकांनी जातनिहाय जनगणना, 10 टक्के लोकांनी काळा पैसा, तर 11 टक्के लोकांनी उत्तर देऊ शकत नाही, असे म्हटल आहे.
543 लोकसभा जागांसाठी करण्यात आला सर्व्हे -या सर्व्हेत सर्व 543 लोकसभा जागांवरून 13 हजार 115 लोकांसोबत संपर्क साधला गेला. हा सर्व्हे 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान करण्यात आला. यात मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते 5 टक्के आहे.