नवी दिल्ली : रोजगार कमी व्हावेत असे कोणतेही कारण नाही, असे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात रोजगारांवर अतिशय विपरीत परिणाम झाल्याच्या टीकेला ते प्रश्नोत्तर तासात उत्तर देत होते.
ते म्हणाले, रोजगार निर्माण होण्यासाठी सरकार वेगवेगळ््या योजना राबवत आहे. ऐसा कोई कारण नही है की रोजगार कम हुआ है. तृणमूल काँग्रेसचे सदस्य कल्याण बॅनर्जी यांनी त्यांच्या पुरवणी प्रश्नात म्हटले होते की, माझ्या मतदारसंघात नोटाबंदीच्या निर्णयामुळे हजारो रोजगार बुडाले आहेत आणि त्याबाबत सरकार काही उपाययोजना करणार आहे का? बॅनर्जी हे पश्चिम बंगालमधील सिरामपोर मतदारसंघातून निवडून आले आहेत. बॅनर्जी यांच्या प्रश्नाला गंगवार यांनी वरील उत्तर दिले.
नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारने जुन्या ५०० आणि एक हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. गंगवार यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक नागरिकाला देशाच्या कोणत्याही भागात रोजगाराच्या चांगल्या संधी शोधण्यासाठी आणि उत्तम भवितव्यासाठी स्थलांतर करण्याचा हक्क आहे. भारतात कुठेही विना अडथळा जाण्याची मुभा सगळ््या नागरिकांना घटनेने दिली आहे, असे गंगवार म्हणाले. गंगवार म्हणाले की, सरकार इंटर-स्टेट मायग्रंट वर्कमेन (रेग्युलेशन आॅफ एम्प्लॉयमेंट अँड कंडीशन्स आॅफ सर्व्हीस) अॅक्ट, १९७९ ची अमलबजावणी करीत आहे. त्यामुळे रोजगारांसाठी स्थलांतर करणाऱ्यांना ज्या हालअपेष्टांना तोंड द्यावे लागते त्या सौम्य होतील.