यूपीएच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाले? लष्कर म्हणतं...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 08:47 AM2019-05-08T08:47:46+5:302019-05-08T08:49:36+5:30

काँग्रेस, भाजपाचे सर्जिकल स्ट्राइकवरुन दावे-प्रतिदावे

no records of surgical strikes during UPA regime says Centre in In RTI reply | यूपीएच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाले? लष्कर म्हणतं...

यूपीएच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाले? लष्कर म्हणतं...

Next

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकवरुन काँग्रेस आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपली आहे. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक करुन दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केला जात आहे. यानंतर काँग्रेसनंदेखील यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा केला. भाजपा, काँग्रेस सर्जिकल स्ट्राइकवरुन एकमेकांवर 'स्ट्राइक' करत असताना प्रथमच लष्करानं यावर भाष्य केलं आहे. लष्करानं सर्जिकल स्ट्राइकबद्दलच्या आरटीआयला उत्तर दिलं आहे.  

यूपीए सरकारच्या काळात पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकची माहिती उपलब्ध नसल्याचं लष्करानं आरटीआयला दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे. लष्कराच्या डीजीएमओ (डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स) यांनी ही माहिती दिली आहे. यासाठी जम्मू-काश्मीरमधले आरटीआय कार्यकर्ते रोहित चौधरींनी अर्ज केला होता. 2004 ते 2014 या कालावधीत भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये घुसून किती सर्जिकल स्ट्राइक केले आणि त्यातले किती यशस्वी झाले, असे प्रश्न चौधरींनी त्यांच्या अर्जात विचारले होते. 29 सप्टेंबर 2016 च्या आधी सर्जिकल स्ट्राइक झाल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असं उत्तर डीजीएमओंनी या आरटीआयला दिलं.

पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये अनेकदा सर्जिकल आणि एअर स्ट्राइकचा उल्लेख केला आहे. काँग्रेसच्या काळात दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जात नव्हतं, असंदेखील मोदींनी अनेकदा म्हटलं आहे. तर गेल्याच आठवड्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा केला. आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले. मात्र कधीही त्याचा वापर मतं मिळवण्यासाठी केला नाही, असं सिंग एका मुलाखतीत म्हणाले.

मनमोहन सिंग यांच्या दाव्यानंतर काँग्रेसनं एक पत्रकार परिषद घेतली. त्यात पक्षाचे प्रवक्ते राजीव शुक्ला यांनी यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा केला. शुक्ला यांनी पत्रकारांना संबोधित करताना सर्जिकल स्ट्राइक नेमके कुठे आणि कधी करण्यात आली, याची तपशीलवार माहिती दिली. पूंछमधील भट्टल सेक्टर (19 जून 2018), केलमधील शारदा सेक्टर (30 ऑगस्ट-1 सप्टेंबर 2011), सावन पात्रा चेकपोस्ट (6 जानेवारी 2013), नाझपीर सेक्टर (27-28 जुलै 2013), नीलम व्हॅली (6 ऑगस्ट 2013) आणि 23 डिसेंबर 2013 रोजी सर्जिकल स्ट्राइक करण्यात आल्याचं शुक्ला म्हणाले. यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाले. मात्र त्याचा राजकीय फायद्यासाठी वापर केला नाही, अशा शब्दांत शुक्ला यांनी मोदींना टोला लगावला.  
 

Web Title: no records of surgical strikes during UPA regime says Centre in In RTI reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.