मोरबी : गुजरातच्या मोरबी शहरातील मच्छू नदीवरील केबल पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या सोमवारी १३४ वर पोहोचली असून, अद्याप बचावकार्य सुरू आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांचे बचाव कार्यावर लक्ष आहे.
या घटनेत आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली असून, पुलाची देखभाल करणाऱ्या कंपनीविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. हा पूल शतकाहून अधिक जुना आहे. दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामानंतर पाच दिवसांपूर्वी तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. पूल खुला करण्याची घाई का करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
मोरबीचे ४३ वर्षांपूर्वी झाले होते स्मशान...
पुल अपघाताने मोरबीतील जनतेला पुन्हा एका वेदनादायक घटनेची आठवण करून दिली. मच्छू नदीवरील धरण फुटल्याने ११ ऑगस्ट १९७९ रोजी या संपूर्ण शहराचे स्मशानभूमीत रूपांतर झाले होते. १४०० जणांचे बळी गेले होते. ११ ऑगस्ट १९७९ रोजी दुपारी सव्वातीन वाजता धरण फुटले आणि १५ मिनिटांत धरणाच्या पाण्याने संपूर्ण शहर व्यापले. काही वेळातच संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाले. घरे आणि इमारती कोसळल्या. लोकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. गावातील वीज खांबांवर माणसांपासून जनावरांचे मृतदेह लटकले होते. सगळीकडे केवळ मृतदेहच दिसत होते.
खासदाराच्या १२ नातेवाइकांचा मृत्यू
पूल दुर्घटनेत आपल्या १२ नातेवाइकांचा मृत्यू झाल्याची माहिती राजकोटचे भाजप खासदार मोहन कुंदारिया यांनी सोमवारी दिली. रविवारी ही घटना घडली तेव्हा नातेवाईक पूल आणि परिसरात सहलीला गेले होते. माझ्या मोठ्या भावाच्या मेहुण्याच्या चार मुली, त्यापैकी तिघांचे पती आणि पाच मुले अपघातात मृत्युमुखी पडली, अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुलाला फिटनेस प्रमाणपत्रच नाही...
एका खासगी ऑपरेटरने सहा महिने पुलाच्या दुरुस्तीचे काम केले. २६ ऑक्टोबर रोजी गुजराती नववर्षाच्या दिवशी हा पूल पुन्हा जनतेसाठी खुला करण्यात आला; परंतु स्थानिक प्रशासनाने अद्याप पुलासाठी फिटनेस प्रमाणपत्र जारी केलेले नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
चौकशी समिती स्थापन
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) पाच पथके, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एडीआरएफ) सहा पथके, एक हवाई दल, दोन लष्करी तुकड्या आणि भारतीय नौदलाच्या दोन तुकड्या, स्थानिक बचाव पथके शोधमोहिमेत सामील झाली आहेत. बचावकार्य अजूनही सुरूच असल्याचे यादव यांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारने पूल कोसळण्याच्या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे.