'आपला कॅम्पस धर्मनिरपेक्ष', विद्यापीठाकडून शुक्रवारच्या सरस्वती पुजेला मनाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 02:24 PM2019-02-07T14:24:55+5:302019-02-07T14:26:26+5:30
हिंदू धर्म परंपरेनुसार सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येते.
तिरुवअनंतरपुरम - केरळमधील अलपुझ्झा जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शुक्रवारची सरस्वती पूजा करण्यास कोचीन विद्यापीठाने मनाई केली आहे. आपले विद्यापीठ हे धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगत विद्यापीठाने या आठवड्यातील शुक्रवारच्या सरस्वती पूजनाला बंदी घातली. मात्र, गतवर्षापर्यंत कोचीन विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ही पूजा करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी दर्शवली आहे.
हिंदू धर्म परंपरेनुसार सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येते. त्यामुळेच, कट्टनाड येथील कोचीन विद्यापीठात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातील उत्तर भारतीय विद्यार्थ्यांनी 9 आणि 11 जानेवारी रोजी महापुजेसाठी परवानगी मागितली होती. कोचीन विद्यापीठाच्या प्राचार्यांनी 1 फेब्रुवारी रोजी याबाबत पत्राद्वारे उत्तर दिले आहे. त्यामध्ये, विद्यापीठ परिसर हा धर्मनिरपेक्ष असून विद्यापीठाच्या आवारात कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला बंदी असल्याचं त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी पाटणामध्ये एका महाविद्यालयात सरस्वती पूजेला बंदीला घालण्यात आली होती, पण त्याचे कारण वेगळं होतं. त्यावेळी, विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये आणण्यात आलेल्या बार गर्लच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल करुन कॉलेज प्रशासनाला अवाक करुन सोडले होते.