नवी दिल्ली : केद्रींय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी 'एक देश एक भाषा' या धोरणाला दिलेल्या समर्थनावरुन राजकीय घमासान सुरुच आहे. याविरोधात दाक्षिणेकडील नेत्यांनी आवाज उठवला आहे. यातच आता दाक्षिणात्य अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन यांनी ट्विट करुन अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
कमल हासन यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये देशात एक भाषा लादली जाऊ शकत नाही, असे झाल्यास मोठे आंदोलन होईल असे म्हटले आहे. ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत कमल हासन म्हणाले, "1950 मध्ये भारत प्रजासत्ताक झाला, त्यावेळी वचन दिले होते की प्रत्येक क्षेत्रातील भाषा आणि संस्कृतीचा सन्मान केला जाईल आणि त्याला सुरक्षित ठेवले जाईल. त्यामुळे कोणताही शाह, सुल्तान किंवा सम्राट हे वचन अचानक तोडू शकत नाही. "
अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या देशाच्या एकतेसाठी त्याग केला आहे. मात्र, लोक आपली भाषा, संस्कृती आणि ओळख विसरू शकत नाहीत. भारत एक असा देश आहे, त्याठिकाणी लोक एकत्र बसून जेवण करतात. कोणावर काही लादू शकत नाही, असे कमल हासन यांनी म्हटले आहे. याशिवाय नवीन कायदा लागू करण्याआधी सामान्य लोकांशी चर्चा केली पाहिजे. जलीकट्टूसाठी जे झाले ते फक्त प्रदर्शन होते. मात्र, भाषा वाचवण्यासाठी जे होईल, ते यापेक्षा मोठे होईल, असा इशाराही कमल हासन यांनी दिला आहे.
दरम्यान, हिंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी आज 'एक देश एक भाषा' या धोरणाला समर्थन केल्यामुळे पुन्हा हा वाद उफाळून आला आहे. अनेक भाषा आपल्याला देशाची मोठी ताकद आहे. मात्र, देशाची एक भाषा गरजेची आहे, कारण विदेशी भाषांना स्थान मिळणार नाही. देशाची एक भाषा लक्षात घेऊन आपल्या पुर्वजांनी राजभाषेची कल्पना केली होती आणि राजभाषेच्या रुपाने हिंदी स्वीकारली होती. त्यामुळे हिंदी भाषेला प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य आहे, असे हिंदी दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अमित शाह यांनी म्हटले होते.
अमित शाहांच्या या वक्तव्यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डीएमकेचे प्रमुख डीएमके स्टॅलिनसह अनेक नेत्यांनी विरोध दर्शविला आहे.