लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘’नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल’वर १९ लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, त्यामुळे देशात नोकऱ्यांची कमतरता नाही,” असा दावा लोकसभेत सोमवारी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी केला.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रोजगार निर्मितीसाठी अनेक योजना सुरू केल्या असून आता बेरोजगारीचा दर ३.२ टक्क्यांवर आला आहे. भविष्यात तो तीन टक्क्यांच्या खाली येण्याची अपेक्षा आहे. जेव्हा देशाची अर्थव्यवस्था सात-आठ टक्के दराने वाढते, तेव्हा उत्पादन क्षेत्र वाढते, सेवा क्षेत्र वाढते, क्रयशक्ती वाढते. हे सर्व झाले तर रोजगाराच्या संधीही वाढतात. काळजी करण्यासारखे काही नाही.
नियोक्त्यांनी ‘नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल’ वर १९ लाख नोकरीच्या संधी पोस्ट केल्या आहेत, जेथे लोक अर्ज करू शकतात. तुमच्या कुटुंबातील कुणाला नोकरीची गरज असेल आणि त्यांची पात्रता असेल तर त्यांना नोकरी मिळेल. देशात नोकऱ्यांची कमतरता नाही, असेही ते म्हणाले.
८० विद्यार्थ्यांची आत्महत्या
गेल्या एका वर्षात राज्यात वैद्यकीय प्रवेशाची तयारी करणाऱ्या ८० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा करत तामिळनाडूचे काँग्रेस सदस्य एस. जोथिमनी यांनी केंद्र सरकारने सुरू केलेली 'नीट' परीक्षा सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे आणि ती रद्द केली पाहिजे, अशी मागणी केली.
४० लाख लोकांना दरवर्षी सापांचा चावा
भाजपचे राजीव प्रताप रुडी यांनी दावा केला की, देशात दरवर्षी ३० ते ४० लाख लोकांना साप चावतो, त्यापैकी ५०-६० हजार लोकांचा मृत्यू होतो. त्यातही साप चावल्यामुळे मृत्यूची सर्वाधिक प्रकरणे बिहारमध्ये घडतात. राज्यात दरवर्षी १० हजारांहून अधिक लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो.