नवी दिल्ली-
कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेबाबतच्या शक्यता आणि धोक्याची चर्चा केली जाऊ लागली होती. तिसऱ्या लाटेबाबत अनेक शंका देखील उपस्थित करण्यात आल्या. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना तिसऱ्या लाटेसाठी निर्णायक महिना ठरेल असं सांगितलं गेलं होतं. पण आता तिसऱ्या लाटे संदर्भातील एक दिलासादायक माहिती आता समोर आली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार कोरोना प्रादुर्भावाच्या आणखी एका लाटेची कोणतीही शक्यता सध्या दिसून येत नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील अंतराचा अभ्यास करता तिसरी लाट ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात येऊ शकते, अशी शक्यता काही वायरोलॉजिस्ट आणि डॉक्टरांनी वर्तवली होती.
तज्ज्ञांच्या मतानुसार ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत जीनोम सिक्वेंसिंग आणि इतर अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार अद्याप व्हायरसच्या म्युटेशनचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. याशिवाय विषाणुचा नवा व्हेरिअंटही समोर आलेला नाही. दरम्यान, सरकार आणि तज्ज्ञांनी फेब्रुवारी २०२२ पर्यंत कोविड नियमांचं पूर्णपणे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. कारण तोवर कोरोना विरोधी लसीकरणात देशाला मोठं यश आलेलं असेल आणि परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक पद्धतीनं पाहायला मिळेल.
SARS-CoV-2 चे जीनोम सिक्वेंसिंगचे नोडल अधिकारी डॉ. व्ही. रवी यांच्या मतानुसार कोरोनाचं संक्रमण डेल्टा व्हेरिअंटपर्यंत मर्यादित राहिलं आहे आणि ते आता कमी होताना दिसत आहे असं अभ्यासातून समोर आलं आहे. लसीकरणाचं प्रमाण वाढलं आहे आणि व्हायरसचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे व्हायरसच्या म्युटेशनचीही शक्यता आता कमी आहे.
नव्या व्हेरिअंटची शक्यता फारच कमीडॉ. व्ही रवी यांच्या म्हणण्यानुसार दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेपर्यंत मर्यादित असलेले Mu आणि C.1.2 सारखे नवे व्हेरिअंट भारतात येण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यातही नवा व्हेरिअंट आलाच तर तो डेल्टा किंवा डेल्टा प्लस इतका घातक नसेल. डेल्टा प्लस हाच दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत व्हेरिअंट होता.
दरम्यान, आरोग्य आयुक्त रणदीप डी यांनी आपल्याला अजूनही खूप सतर्क राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. जोवर १०० टक्के लसीकरण होत नाही. तोवर कोविड प्रतिबंधन नियमांचं काटेकोर पालन करणं खूप गरजेचं असल्याचं ते म्हणाले. कर्नाटकमध्ये सध्या ८० टक्के जनतेला कोरोना विरोधी लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. राष्ट्रीय सरासरी आकडेवारीपेक्षाही हा आकडा चांगला आणि वाखणण्याजोगा आहे, असंही ते म्हणाले. याच दरम्यान ऑगस्टमध्ये एका सीरो सर्व्हेतून समोर आलेल्या माहितीत बंगलोरमध्ये ८० टक्के आणि संपूर्ण कर्नाटकमध्ये ६५ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडी विकसीत झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका खूप कमी झाला आहे.