गजानन चोपडे -
मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आपण किंवा भारतीय किसान युनियनने कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन दिलेले नाही, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले आहे. तर, समाजवादी पक्ष-रालोद आघाडीच्या एखाद्या उमेदवाराला आशीर्वाद दिला म्हणजे कोणत्या तरी पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा दिला असे होत नाही, असेही त्यांनी सांगितले. एकंदरीत टिकैत यांची भाजपविरोधी धार कमी झाल्याचे जाणवले.पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश मतदार संघांमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा प्रभाव आहे. त्यांच्या केंद्र शासनविरोधी भूमिकेमुळे ते समाजवादी पक्षाला पाठिंबा देतील, अशा चर्चादेखील येथे रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर टिकैत यांनी मुजफ्फरनगर येथील निवासस्थानी ‘लोकमत’शी खास बातचीत केली.तेरा महिन्यांचे ते आंदोलनच या निवडणुकीची दिशा ठरविणार असल्याचे सांगत सरकारविरोधी आपली भूमिका असल्याचे संकेत राकेश टिकैत यांनी दिले. या आंदोलनात राकेश टिकैत यांनी फ्रंटफूटवर किल्ला लढवला. त्यांनी सातत्याने केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध कणखर भूमिका घेतली. त्यामुळेच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. त्यांचे समर्थन मिळविण्यासाठी समाजवादी पक्ष व जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भारत सरकारने एमएसपी गॅरंटी कायदा लागू केला, तर त्याचा लाभ अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रालादेखील होईल. तेथेदेखील भूसंपादन, पाणी तथा पिकांच्या दराचा प्रश्न कायम आहे. ते प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण महाराष्ट्रातील यवतमाळला येणारदेखील होतो. मात्र, कोरोना नियमावलीमुळे ते शक्य झाले नाही. तेथेदेखील कापूस, धान, संत्रा अशा पिकांना उत्पादन मूल्यावर आधारित दर मिळत नाही. तेथील हजारो लोक दिल्लीच्या आंदोलनात सहभागी झाले. उभ्या देशातील भूमिपुत्रांसाठी लढताना कुण्या एका पक्षाला तसा पाठिंबा देणे शक्य नाही, असे ते म्हणाले.
बजेटमध्ये कुठे आहे शेतकरी?दोन दिवसांपूर्वी सादर झालेल्या केंद्रीय बजेटमध्ये शेतकरी कुठेच दिसत नाही, ते या निवडणुकीत दिसणार असल्याचा दावा टिकैत यांनी केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कितीही आकडेवारी सादर करत असले तरी ऊस उत्पादक अद्याप लाभापासून वंचित आहेत, असे म्हणत त्यांनी योगींवर निशाणा साधला. खासदार संजय राऊत नुकतेच भेटीला आले होते. त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी महाराष्ट्रातील शेतकरी प्रश्नांवर चर्चा केल्याचे टिकैत सांगतात.