श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नसून हे सरकार उत्तम प्रकारे काम करत असल्याचे भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी स्पष्ट केले. या दोन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयामध्ये झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हे विधान केले आहे. जम्मू काश्मीरचे प्रभारी असणारे राम माधव या बैठकीनंतर म्हणाले," मी पक्षाच्या आमदारांच्या व ज्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांच्याशीही बोलणार आहे. चर्चेनंतर राज्यात होत असलेल्या राजकीय घटनांबाबत निर्णय घेतला जाईल."
दरम्यान, कठुआ बलात्कार प्रकरणानंतर सरकारने कोणत्या प्रकारे पावले उचलली पाहिजेत यावर चर्चा करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या पक्षाच्या आमदारांची भेट घेण्यासाठी श्रीनगरमध्ये आहेत. या खटल्याचा निकाल फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी मेहबुबा मुफ्ती जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाकडे विनंती करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा या गुन्ह्यात समावेश आहे त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.
(जम्मू-काश्मीर सरकारमधील भाजपाच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा)
कठुआ प्रकरणी जम्मू-काश्मीर सरकारमधील भाजपाच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. लाल सिंह आणि चंदर प्रकाश गंगा या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला. जम्मू-काश्मीर सरकारमधील या दोन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांकडून सडकून टीका झाली. इतकंच नाही, तर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही दोन नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचं समर्थन करणाऱ्या रॅलीत सहभागी झाल्याचा आरोप या दोन मंत्र्यावर करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरमधील भाजपाचे प्रमुख सत शर्मा यांनी लाल सिंह आणि चंदर प्रकाश गंगा या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जम्मू-काश्मीर सरकारमध्ये लाल सिंह वनमंत्री आहेत तर गंगा उद्योग आणि वाणिज्य विभागाचे मंत्री आहेत. कठुआ सामूहित बलात्कार प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया न दिल्याने काँग्रेससह सर्वसामान्यांकडून मोदींवर टीका झाली.