ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - रेल्वेने आपल्या तिकीटविक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. काही जणांकडून होणारी एकगठ्ठा तिकीट खरेदी आणि तिकिटविक्रीतील दलाली संपुष्टात आणण्यासाठी रेल्वे आधारकार्डवर आधारित तिकिटविक्रीकडे वळणार आहे. त्यासाठी ऑनालाइन तिकिटखरेदीसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे आधारकार्ड नसल्यास ऑनलाइन तिकिट खरेदी करता येणार नाही.
बऱ्याचदा काही जणांकडून मोठ्या प्रमाणात होणारी तिकीट खरेदी आणि दलालीमुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट खरेदी करता येत नाही, त्याला आळा घालणे हा रेल्वेचा आधारकार्ड सक्तीमागचा हेतू आहे. तचेस रेल्वे तिकिटांवर सवलत मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना येत्या 1 एप्रिलपासून आपला आधार क्रमांक द्यावा लागणार आहे.
"आयआरसीटीसीच्या साइटवर वन टाइम रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्डचा क्रमांक अनिवार्य असेल. त्यामुळे खोटी ओळख देऊन तिकीट आरक्षित करणाऱ्यांना आळा बसणार आहे," असे रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच कॅशलेस तिकीट विक्रीला चालना देण्यासाठी रेल्वेकडून देशभरात सहा हजार पॉईंट ऑफ सेल मशीन आणि एक हजार ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन लावण्यात येणार आहेत.