चेन्नई- तामिळनाडूमध्ये सापडलेल्या किळादी संस्कृतीबद्दल अमेरिकेत भाषण देण्यासाठी चाललेल्या संशोधक के, अमरनाथ रामकृष्ण यांना पुरातत्व विभागाने परवानगी नाकारली आहे. अमेरिकेत जाण्यास मज्जाव करताना पुरातत्व विभागाने कोणतेही कारण दिलेले नाही. इ.स.पू. 200 वर्षांपूर्वी तामिळनाडूत प्राचीन संस्कृती अस्तित्त्वात होती असा दावा येथे झालेल्या उत्खनानंतर करण्यात आला आहे. तसेच येथे धर्मनिरपेक्ष समाज अस्तित्त्वात होती असे सांगण्यात येते.
तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यामध्ये किळादी येथे प्राचीन संस्कृती अस्तित्त्वात असल्याचे पुरावे के. अमरनाथ यांना काही वर्षांपुर्वी सापडले होते. मात्र त्यानंतर त्यांची लगेचच बदली करण्यात आली. आता ते पुरातत्व विभागाच्या गुवाहाटी मंडलात पुरातत्त्व अभ्यासक आहेत. अमेरिकेतील फेडरेशन ऑफ तमिळ संगम या संस्थेमध्ये त्यांना किळादी येथील संस्कृतीबद्दल बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांना अमेरिकेत जाण्यास पुरातत्त्व विभागाने परवानगी नाकारली आहे.याबाबत बोलताना अमरनाथ म्हणाले, ''पुरातत्त्व विभागाने मला अमेरिकेस जाण्यास का परवानगी नाकारली हे माहिती नाही. मला यावर काहीही बोलायचे नाही.'' असे निर्णय काही विशिष्ट परिस्थितीत घेतले जातात, या निर्णयाला कारणीभूत असलेली परिस्थिती मला माहिती नाही. जर ठोस कारण असेल तर अधिकाऱ्यांना परदेशात जाण्याची परवानगी मिळते, पण प्रत्येकालाच अशी परवानगी मिळेल असे नाही. अशी प्रतिक्रिया पुरातत्व विभागाचे संचालक डी.एन तिम्री यांनी दिली आहे.2 एप्रिल रोजी अमेरिकेतील तमिळ संगम संस्थेने अमरनाथ यांना किळादी येथील प्राचीन संस्कृतीबद्दल बोलण्यासाठी आमंत्रिक तेले होते. 26 एप्रिल रोजी अमरनाथ यांनी पुरातत्व विभागाच्या उपसंचालकांकडे अमेरिकेत जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र उपसंचालक ताराचंद्र यांनी 25 मे रोजी मला आपणास या कार्यक्रमासाठी जाता येणार नाही असे सांगण्यास कळवले आहे असे उत्तर पाठवले. तमिळ संगमचे पी.पी. रामकृष्ण यांनी पुरातत्त्व विभागाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत हा एक दुर्देवी निर्णय आहे असे मत व्यक्त केले. यामुळे विभागाच्या हेतूवर शंका निर्माण होते. अमेरिकेतील कार्यक्रमासाठी 5000 लोक उपस्थित राहाण्याची शक्यता होती. अमरनाथ यांचे अनुभव ऐकण्याची संधी त्यांना मिळणार होती.
किळादी हे लहानसे गाव असून तामिळनाडूतील शिवगंगा आणि मदुराई या जिल्ह्यांच्यामध्ये आहे. येथे झालेल्या उत्खननात प्राचीन पांड्य राजवटीचा व रोमन संस्कृतीमध्ये व्यापारी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. या उत्खनानात मातीची भांडी, सोन्याचे हस्तीदंताचे दागिने तसेच इतर अनेक वस्तू सापडल्या आहेत.