गेल्या काही दिवसांपासून अॅलोपॅथी आणि आयुर्वेद असा वाद रंगल्याचं दिसून आलं होतं. यावर डीआरडीओचे माजी प्रमुख आणि नीति आयोगाचे सदस्य व्ही.के.सारस्वत यांनी भाष्य केलं आहे. "अॅलोपॅथी आणि आयुर्वेद याबद्दल वादविदाचा काहीही अर्थ नाही. दोन्ही वेगवेगळे आणि उपयोगी उपचार पद्धती आहेत," असं सारस्वत म्हणाले. आयुर्वेदाला जनतेमध्ये अधिक स्वीकार्य बनवण्यासाठी त्यात अधिक संसोधन करण्यावर भर दिला पाहिजे असंही ते म्हणाले.
सारस्वत हे जीआरडीओकडून कोरोनाच्या उपचारांवरील औषध विकसित करण्याशी निगडीत आहेत. यावेळी त्यांनी पतंजली आणि डीआरडीओ यांच्यातील संबंधांवर सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं. डीआरडीओच्या औषधाचा पतंजलीशी कोणत्याही प्रकारचं घेणंदेणं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. "भारतात हजारो वर्षांपासून चालत आलेल्या उपचार पद्धती आहेत. आयुर्वेदीक औषधं लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीची क्षणता सुधारण्यासाठी परिचित आहे," असं सारस्वत म्हणाले.
दोन निराळे प्रवाह
"मला वाटतं की आयुर्वेद आणि अॅलोपॅथी हे उपचाराचे दोन निराळे प्रवाह आहेत आणि ते एकत्र पुढे जातात. एकाची एक विशेष भूमिका आहे, तर दुसऱ्याची दुसरी," असंही ते म्हणाले. या प्रकरणी वाद होणं हे निरर्थक आहे आणि दोन्ही उपचार पद्धती उपयोगी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. "मला असं वाटतं की आयुर्वेदिक उपचार पद्धतीला समाजात अधिक मान्यका मिळण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींना समजून अधिक संशोधन करण्याची गरज आहे, जे अॅलोपॅथीनं केलं आहे," असं सारस्वत यांनी नमूद केलं.2DG आणि पतंजलीचा संबंध नाही"2DG आणि पंतजली यांच्यात कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. पतंजलीला याबद्दल कोणतीही माहिती नाही आणि हे त्यांचं काम नाही," असं सारस्वत यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं. ज्यावेळी हे औषध विकसित करण्यात आलं तेव्हा आपण वैज्ञानिक सल्लागार होतो. जेव्हा औषध विकसित करण्यात आलं तेव्हा ते मूलत: कर्करोगानं पीडित रुग्णांच्या उपचाराच्या मदतीसाठी होतं असं ते म्हणाले.