पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या महिन्याच्या अखेरिस पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्य आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. परंतु अशातच पश्चिम बंगालचे कृषीमंत्री तपन दासगुप्ता यांच्या एका वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका आणि विरोध होऊ लागला आहे. तपन दासगुप्ता यांनी थेट मतदारांनाच धमकी दिली आहे. जर आपल्याला मत दिलं नाही तर परिणामांना सामोरं जावं लागेल, असं म्हणत दासगुप्ता यांनी मतदारांना धमकावलं."जर आपल्याला मत दिलं नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील," असं दासगुप्ता म्हणाले. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार हुगळी येथे आयोजित एका सभेदरम्यान दासगुप्ता यांनी मतदारांना उघडपणे धमकी देत तत्यांना जर मतं मिळाली नाहीत तर ते त्या क्षेत्रात वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा बंद करतील, अशी धमकी त्यांनी दिली. तपन दासगुप्ता यांना तृणमूल काँग्रेसकडून सप्तग्राम विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी देण्यात आली आहे.
शनिवारी तपन दासगुप्ता यांनी एका रॅलीला संबोधित केलं. "ज्या क्षेत्रातून मला मतं मइळणार नाही त्या क्षेत्रात वीज आणि पाणी पुरवठा केला जाणार नाही. सामान्य बाब आहे त्यांनी भाजपकडून वीज आणि पाणी मागावं," असं ते म्हणाले. २०११ मध्ये हुगळीतील सप्तग्राम येथून दासगुप्ता निवडून आले होते. २०१६ मध्येही त्यांनी सप्तग्राममधून निवडणूक जिंकली होती. २०२१ मध्येही त्यांना आता सप्तग्राम येथूनच उमेदवारी देण्यात आली आहे.
यापूर्वीही धमकी
दासगुप्ता हे तृणमूल काँग्रेसचे पहिले नेते नाहीत ज्यांनी कोणाला मत न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याची धमकी दिली. यापूर्वी तृणमूल काँग्रेसचे आमदार हमिदुल रेहमान यांनीदेखील मतदारांना गद्दार म्हटलं होतं. दिनाजपूर येथे आयोजित एका सभेत रेहमान यांनी मतदारांना धमकी दिली होती. "सरकारी योजनांचा लाभ घेतल्यानंतरही जे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत गद्दारी करतील त्यांच्याकडे निवडणुकांनंतर पाहिलं जाईल," असं ते म्हणाले होते.