लखनऊ - उत्तर प्रदेशात सध्या महापालिका निवडणुकांची रंगत पाहायला मिळतेय. उत्तर प्रदेशमधल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. भारतात रामाशिवाय कोणतंही काम होऊ पूर्ण होऊ शकत नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाकडून खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचारात सक्रिय झाले आहेत. भगवान रामाचं नाव घेतल्याशिवाय कोणतंही काम पूर्ण होणार नाही. प्रभू राम हे आमची आस्था आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. देशाच्या पूर्ण आस्थेचं केंद्रबिंदू भगवान राम असल्याचंही योगी आदित्यनाथांनी यावेळी आवर्जून सांगितलं आहे.उत्तर प्रदेश पालिका निवडणूक म्हणजे ही आमच्यासाठी एक प्रकारची परीक्षा आहे. आजपर्यंत केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आम्ही पालिका निवडणुकीतील निकालाकडे पाहतो, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 12 दिवसांत 33 सभा घेणार आहेत.आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकरही 16 नोव्हेंबर रोजी अयोध्येचा दौरा करणार आहेत. ते राम जन्मभूमीच्या वादावर शांतीपूर्णरीत्या तोडगा काढण्यासाठी इतर पक्षकारांची भेट घेणार आहेत. परंतु श्री श्री रविशंकर हे मध्यस्थी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. टीकाकारांची तोंडं मी बंद करू शकत नाही. राम मंदिराचा हा मुद्दा चर्चेनेच सुटू शकतो आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असंही श्री श्री रविशंकर म्हणाले आहेत. श्री श्री रविशंकर हे अयोध्या दौ-याच्या वेळी लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार आहेत, अशी माहिती त्यांचे प्रतिनिधी भव्य तेज यांनी दिली आहे. श्री श्री रविशंकर 16 नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाणार आहेत. राम मंदिर वादातील हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांनाही श्री श्री रविशंकर यांच्या दौ-याची पूर्वकल्पना देण्यात आली आहे.
भारतात रामनामाशिवाय होऊ शकत नाही कोणतंही काम- योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 1:11 PM