नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरमध्ये ताब्यात असलेल्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना कोणीही राष्ट्रविरोधी म्हटलेले नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यांच्या सुटकेवर केंद्रशासित प्रदेश निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.एका वृत्तसंस्थेकडून आयोजित कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले की, फारुक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना चिथावणीखोर वक्तव्ये केल्यामुळे ताब्यात घ्यावे लागले. आपण त्यांचे वक्तव्ये पाहा.‘कलम ३७० ला धक्का जरी लावला तरी, संपूर्ण देश जळून जाईल’, असे वक्तव्ये केली गेली. त्यामुळेच त्यांना काही काळासाठी ताब्यात घेण्यात आले. तीन माजी मुख्यमंत्र्यांसह जम्मू- काश्मीरच्या काही नेत्यांना ५ आॅगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले होते. त्याच दिवशी कें द्र सरकारने काश्मीरमधील कलम ३७० हटविले होते. तसेच, जम्मू- काश्मीर व लडाख, अशा दोन केंद्रशासित प्रदेशात याचे विभाजन करण्यात आले.फारुक अब्दुल्ला यांना श्रीनगरमधील गुपकर रोडस्थित त्यांच्या निवासस्थानापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले आहे. त्यांच्या निवासस्थानालाच उपतुरुंग घोषित करण्यात आले आहे. त्यांचे पुत्र उमर यांना हरि निवासमध्ये ताब्यात ठेवण्यात आले आहे. पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना सरकारी निवासस्थानात पाठविण्यात आले.स्थानिक प्रशासन निर्णय घेईलअब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती यांचा पीडीपी हे पक्ष कधीकाळी भाजपचे सहयोगी होते.आता त्यांना राष्ट्रविरोधी ठरविले जात आहे, असा सवाल केला असता ते म्हणाले की, आपण अथवा सरकारमधील कोणीही त्यांना असे म्हटलेले नाही. त्यांच्या सुटकेबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेईल.जेव्हा योग्य वाटेल तेव्हा प्रशासन त्यांची सुटका करील. काश्मीरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आज काश्मीरमध्ये एक इंचही जमीन संचारबंदीत नाही.
काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना कोणीही राष्ट्रविरोधी म्हटले नाही -अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 3:12 AM