ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - नोटाबंदीचा निर्णय हा काळ्या पैशावर केलेला थेट हल्ला आहे. या निर्णयामुळे काळा पैसा साठवणाऱ्यांना तो बाहेर काढावा लागला आहे. या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेस मजबुती मिळणार असून, विविध क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगारांमध्ये वाढ होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर प्रथमच प्रसारमाध्यमांशी थेट संवाद साधताना दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाची आवश्यकता आणि होणाऱ्या परिणामांबाबत सविस्तर माहिती दिली. मोदींनी इंडिया टुडे या नियतकालिकाला ही मुलाखत दिली आहे. इंडिया टुडेच्या पुढील अंकात ही मुलाखत प्रकाशित होणार आहे.
या मुलाखतीदरम्यान नोटाबंदीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना मोदी म्हणाले, "500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा भ्रष्टाचारावर केलेला थेट हल्ला आहे. या निर्णयामुळे काळा पैसा जमा करणाऱ्यांना तो बाहेर काढावा लागला आहे. भ्रष्टाचारी आणि काळा पैसावाल्यांविरोधात केलेला थेट हल्ला आहे. भ्रष्टाचाऱ्यांविरोधात आम्ही 'तू डाल डाल, मै पात पात' असे धोरण स्वीकारले आहे."
काळा पैसा पांढरा करण्याचे प्रयत्न झाले तरी काळा पैसावाले वाचणार नसल्याचा दावा मोदींनी केला."नोटाबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले, पण अशा प्रत्येकाची माहिती आम्हाला मिळाली आहे. काळा पैसावाले आपली ओळख लपवू शकणार नाहीत. दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले तरी त्यांच्यासाठी वाचणे अशक्य आहे. काळा पैसा संपवणे हे आमचे लक्ष्य. बेहिशोबी मालमत्ताधारकांना अजून एक संधी देत आहोत."
मोदी पुढे म्हणाले, "काळा पैसा बँकींग व्यवस्थेत यावा अशी आमची इच्छा होती. नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणावर काळा पैसा मुख्य प्रवाहात आला आहे. नोटाबंदीमुळे बॅंकात जमा झालेल्या पैशामुळे अर्थव्यवस्थेच मजबुती मिळणार आहे. त्यातून कृषी, उप्तादन आणि सेवा क्षेत्रात रोजगार वाढण्यास मदत होईल. " .यावेळी डि़जिटल व्यवहारांचे प्रमाण वाढणे आवश्यत असल्याचेही त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशात काही महिन्यांनी होत असलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांच्या पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी आग्रही असल्याचेही मोदींनी मुलाखतीत सांगितले.