नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयाला होत असलेल्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. मात्र नोटाबंदीचा हेतू सफल झाल्याचा दावा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. मंगळवारी गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या मनमोहन सिंग यांनी 8 नोव्हेंबर हा भारताच्या लोकशाहीमधील काळा दिवस असल्याचे सांगत नोटाबंदी म्हणजे संघटीत कायदेशीर लूट असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला होता. दरम्यान, अरुण जेटली यांनी फेसबुकवर लिहिलेल्या ब्लॉगवरून नोटाबंदीबाबत होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच 8 नोव्हेंबर 2016 हा दिवस ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे.आपल्या फेसबुक पोस्टमध्ये जेटली म्हणतात, "8 नोव्हेंबर हा दिवस ऐतिहासिक आहे. हा दिवस सरकारच्या देशाला काळ्या पैशाच्या गंभीर आजारापासून वाचवण्याच्या संकल्पाला अधोरेखित करतो. काळ्या पैशाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे त्यावेळच्या सरकारने कशा प्रकारे काणाडोळा केला होता हे देश जाणतो. तसेच निनावी प्रॉपर्टी कायदा लागू करण्याला 28 वर्षे विलंब होणे हे तत्कालिन सरकारच्या काळ्या पैशाविरोधातील लढाईतील अनिच्छेचे उदाहरणच आहे.""आज देश काळा पैसा विरोधी दिवस साजरा करण्यासाठी एकत्र येत असताना नोटाबंदीच्या निर्णयाचा हेतू साध्य झाला का अशी विचारणा करण्यात येत आहे. नोटाबंदीच्या मोठ्या उद्देशांमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला कमी रोख असलेली अर्थव्यवस्था बनवणे हा मुख्य हेतू होता. गेत्या वर्षीच्या तुलनेत व्यवहारामध्ये रोख रक्कम कमी झाली आहे. त्यामुळे हा हेतू साध्य झाला असे म्हणता येईल. तसेच नोटाबंदीमुळे प्राप्तिकराचा अवाका वाढला आहे. प्राप्तिकर विभागाने 13 हजार 300 कोटींचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी 22 हजार जणांनी वापरलेल्या 1150 शेल कंपन्यांवर कारवाई केली."
नोटाबंदीचा हेतू सफल, वित्तमंत्री अरुण जेटली यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 3:11 PM