नोटाबंदी अन् जीएसटीने व्यवसायांचे कंबरडे मोडले, राहुल गांधी यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 03:19 AM2017-11-02T03:19:32+5:302017-11-02T03:19:51+5:30
जागतिक बँकेच्या उद्योगस्नेही देशाच्या यादीत भारताला १००वा क्रमांक मिळाल्याचा अहवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी फेटाळला. वास्तव स्थिती समजण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी छोट्या व्यावसायिकांना भेटावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
जम्बुसर (गुजरात) : जागतिक बँकेच्या उद्योगस्नेही देशाच्या यादीत भारताला १००वा क्रमांक मिळाल्याचा अहवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी फेटाळला. वास्तव स्थिती समजण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी छोट्या व्यावसायिकांना भेटावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
दक्षिण गुजरातच्या तीनदिवसीय दौºयावर आलेले राहुल गांधी यांनी पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून कठोर टीका केली. नोटाबंदीने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, असे सांगतानाच त्यांनी जाहीर सभेत केंद्र व राज्य सरकारचे जातीयवादी राजकारण व कॉर्पोरेटचे हितसंबंध जोपासण्यासह अनेक मुद्दे उपस्थित केले. जागतिक बँकेच्या अहवालाबाबत ते म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी छोट्या व मध्यम व्यावसायिकांशी १० मिनिटे बोलावे व त्यांना विचारावे की, त्यांच्या व्यवसायात सुगमता आली आहे काय? संपूर्ण देश ओरडून सांगेल की, व्यवसायात सुगमता बिलकूल आलेली नाही. तुम्ही हे सगळे उद्ध्वस्त केले आहे. तुमच्या नोटाबंदी व जीएसटीने हे सगळे नष्ट केले आहे.
नोटाबंदीच्या निर्णयावर कडाडून टीका करताना ते म्हणाले की, काळ्या पैशाचा मोठा भाग सोने, भूखंड व स्विस बँकांमधील पैशाच्या रूपात आहे, हे सरकारच्या लक्षात आले नाही. मागील वर्षी ८ नोव्हेंबरला मोदी सरकारने ५०० व १०००च्या नोटांवर बंदी घातली. लहान व्यापारी, दुकानदार, शेतकरी हे सर्व रोखीत व्यवहार करतात. ते चोर नव्हेत. त्यांचा पैसा हा काळा पैसा असू शकत नाही; परंतु रोख रक्कम हा काळ्या पैशाचा भाग नाही व सर्व काळा पैसा रोख स्वरूपात नाही, हेच सरकारला कळाले नाही. स्विस बँकेतील पैशांबद्दल भाजपाने बरेच रान उठवले होते. मागील तीन वर्षे ते सत्तेत आहेत. मला सांगा त्यांनी स्विस बँकेच्या देशातील किती खातेधारकांना जेलमध्ये टाकले? मोदींनी या कारणासाठी जेलमध्ये टाकलेल्या एका व्यक्तीचे नाव सांगा. नोटाबंदीने आपला जीडीपी २ टक्क्यांनी कमी झाला.
सब को मालूम है...
जागतिक बँकेच्या अहवालावरून राहुल गांधी व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यात टिष्ट्वटरवरून आरोप-प्रत्यारोप झाले. राहुल यांनी मिर्झा गालिब यांच्या शेरवर टिष्ट्वट करताना म्हटले की, सब को मालूम है ‘कारोबार सुगमता’ की हकिकत, लेकीन खुद को खुश रखने के लिए ‘डॉक्टर जेटली’ ये ख्याल अच्छा है.
यावर प्रत्यारोप करताना जेटली यांनी म्हटले की, भ्रष्टाचारस्नेहीचे स्थान उद्योगस्नेही रँकिंगने घेतले आहे आणि हाच संपुआ व रालोआ सरकारमधील फरक आहे.