नोएडा : 48 वर्षांनंतर भारत वर्ल्ड डेअरी समिट-2022 चे आयोजन करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ग्रेटर नोएडा येथे चार दिवसीय वर्ल्ड डेअरी समिटचे उद्घाटन करणार आहेत. इंडिया एक्स्पो मार्ट येथे होणाऱ्या कार्यक्रमात देशी गाय आणि म्हशींचे पुतळे लावण्यात आले आहेत. ते पाहिल्यानंतर हुबेहुब गायी-म्हशींसारखे वाटतात. प्रत्येक सभागृहाबाहेर लावलेल्या पुतळ्यांवर भारतातील विविध प्रदेशातील प्रमुख गायी-म्हशींच्या जातींचे ब्रँडिंग असणार आहे. इतकेच नाही तर भारतीय तज्ज्ञ परदेशी पाहुण्यांसमोर या जातींच्या महत्त्वावर व्याख्यानेही देणार आहेत.
इंडिया एक्स्पो मार्टच्या 11 हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. प्रवेशद्वार ते हॉल गेटपर्यंत विविध जातींच्या गायी-म्हशींचे पुतळे उभारण्यात आले आहेत. या प्रजातींच्या नावावर अलीकडील नावे ठेवण्यात आली आहेत, ज्यावर तज्ज्ञ व्याख्याने देतील. विशेषतः गीर, राठी, साहिवाल, थारपरकर, लाल, सिंधी गायींचे पुतळे लावण्यात आले आहेत. तसेच, जाफ्राबादी, पंढरपुरी, मुर्रा, महसानी, नागपुरी आणि नीली रवी या म्हशींच्या प्रजातींनाही अशीच नावे देण्यात आली आहेत. दरम्यान, वर्ल्ड डेअरी समिटचे आजपासून चार दिवस म्हणजेच 12 ते 15 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या समिटची थिम 'पोषण आणि उपजीविकेसाठी दुग्धव्यवसाय' या विषयावर केंद्रित आहे.
भारताला पहिल्यांदा 1974 मध्ये वर्ल्ड डेअरी समिट आयोजित करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर आता कित्येक वर्षांनंतर संधी मिळाल्यानंतर भारत दूध उत्पादनाच्या क्षेत्रात जागतिक ब्रँडिंगवर भर देत आहे. जेणेकरून देशातील उत्पादनांचा जागतिक बाजारपेठेत दबदबा निर्माण करता येईल. तसेच कंपन्यांनाही गुंतवणुकीसाठी आकर्षित केले पाहिजे. नोएडा येथे 12 ते 15 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या परिषदेत 50 देशांतील 1433 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. यात अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, न्यूझीलंड आणि बेल्जियममधून मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे.
भारताचे वार्षिक दूध उत्पादन 210 दशलक्ष टनदरम्यान, भारत दूध उत्पादनात (Milk Production) जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या भारताचे वार्षिक दूध उत्पादन 210 दशलक्ष टन आहे. परंतु भारताची दूध उत्पादकता मात्र खूपच कमी आहे. प्रति जनावर दूध उत्पादन म्हणजे दुधाळ जनावरांची उत्पादकता. दूध उत्पादकतेत भारत अनेक विकसित देशांच्या तुलनेत खूपच पिछाडीवर आहे. त्यामुळे या होणाऱ्या वर्ल्ड डेअरी समिटमधून उत्पादकतेच्या प्रश्नावर ठोस तोडगा काढण्यासाठी बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एनडीडीबीच्या आकडेवारीनुसार, भारताचे संघटित क्षेत्राकडून होणारे दैनंदिन दूध संकलन सुमारे 12 कोटी लिटर आहे. त्यापैकी सुमारे सहा कोटी लिटर दूध सहकारी संस्थांकडून आणि उर्वरित दूध खासगी कंपन्यांकडून संकलित केले येते.