नोएडा: नोएडातील एका वकिलाची कहानी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. एका कंपनीत खासगी नोकरी करणाऱ्या आकाश चौहान यांनी वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आधी एलएलबीचे शिक्षण घेतले आणि दहा वर्षांनी स्वत:च वकिली करत दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिली. या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहा वर्षांपूर्वी आकाश चौहान यांच्या वडिलांचा वाळू माफियांनी घरात घुसून दिवसाढवळ्या खून केला होता. या घटनेनंतर वर्षभरातच लहान भावाचा मृतदेहही रेल्वे रुळावर सापडला. या दोन घटनांनंतर त्यांच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली, पण त्यांनी बंदूक उचलली नाही, उलट कायद्याचे शिक्षण घेतले. स्वत: वडील आणि भावाचे प्रकरण पुन्हा सुरू केले आणि वडिलांच्या मारेकऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिली.
दहा वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं? आकाश चौहान यांचे वडील पाले राम चौहान सामाजिक कार्यकर्ते होते. यमुनेतील बेकायदेशीर वाळू उपसा थांबवण्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. स्थानिक पातळीवर कोणतीही सुनावणी होत नसल्याने, त्यांनी 2012 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. याचा राग आल्याने वाळू माफियांनी 31 जुलै 2013 रोजी भरदिवसा त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडल्या. या घटनेच्या सुमारे 10 महिन्यांनंतर आकाशच्या धाकट्या भावाचा मृतदेहही दिल्लीतील नरेला भागात रेल्वे ट्रॅकवर सापडला होता.
या दोन घटनांनंतर आकाश यांनी पोलिस स्टेशनच्या अनेक फेऱ्या मारल्या, पण पोलिसांनी त्यांना गांभीर्याने घेतले नाही. त्या काळा त्यांनी माजी सरकारी वकील के.के. सिंग यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या सल्ल्याने आपली प्रस्थापित नोकरी सोडून ग्रेटर नोएडा येथील कॉलेजमधून एलएलबी केले. वकील झाल्यानंतर त्यांनी स्वत: वडिलांच्या खुनाचा खटला लढवला. त्यांना कोर्टात के.के.सिंग यांचीही साथ मिळाली आणि दहा वर्षांच्या खडतर संघर्षानंतर आता चार आरोपींपैकी दोन आरोपी राजपाल चौहान आणि त्यांच्या एका मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अन्य दोन आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.