नोएडामध्ये एका सर्वसामान्य ग्राहकाला तब्बल चार कोटी रुपयांचं बिल देण्यात आल्याने वीज विभागाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. एवढं मोठं बिल पाहून घरमालकाला धक्काच बसला. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार या व्यक्तीने वीज विभागाकडे केली आहे. याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली असून एका घराचं बिल कोट्यवधी रुपये कसं येऊ शकतं हा प्रश्न पडला आहे.
वीज विभागाने नोएडा येथील सेक्टर-१२२ मध्ये राहणाऱ्या एका ग्राहकाला जुलैमध्ये ४ कोटी २ लाख रुपयांचं वीज बिल पाठवलं. फोनवर वीज बिलाचा मेसेज पाहून ग्राहक हैराण झाला. यानंतर त्याने या संपूर्ण प्रकरणाची तक्रार वीज विभागाकडे केली. घरमालकाने सांगितले की, वीज कंपनीकडून एक एसएमएस अलर्ट मिळाला होता ज्यामध्ये त्याला कळवलं होतं की त्यांचं तीन महिन्यांचं वीज बिल – ९ एप्रिल ते १८ जुलै – ४०२३१८४२.३१ रुपये आहे आणि रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख २४ जुलै देण्यात आली आहे..
मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर-१२२ च्या सी ब्लॉकमध्ये राहणारे बसंत शर्मा हा रेल्वेत काम करतो. यावेळी बसंत याच्या मोबाईलवर वीजबिलाबाबतचा संदेश आला. मात्र यावेळी वीज बिलाची रक्कम पाहून बसंत शर्मा हादरला. कारण, वीज विभागाने पाठवलेल्या बिलात बसंत शर्माला चार कोटी २ लाख रुपयांचं बिल पाठवण्यात आलं होतं.
बसंत हा प्रशिक्षणासाठी शिमला येथे गेला होता. वीज बिल पाहिल्यानंतर त्याने तात्काळ सेक्टरच्या आरडब्ल्यूए अधिकाऱ्याला माहिती दिली आणि वीज विभागाकडे तक्रार केली. वीजबिल भरण्यासाठी वीज विभागाने बसंतला २४ जुलैपर्यंत मुदत दिली होती. बसंतला दरमहा सरासरी वीज बिल १००० रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र यावेळी अचानक बिल चार कोटी रुपये आले.
विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब समजल्यानंतर वीज बिल २८ हजार रुपये झाले. नोएडा येथील इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशनचे मुख्य अभियंता हरीश बन्सल यांनी सांगितलं की, एक प्रकरण आमच्या निदर्शनास आलं होतं, ग्राहकांचं बिल थांबवण्यात आलं होतं, परंतु त्यानंतरही त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचला, ही मानवी चूक आहे, आता बिल आलं आहे. दुरुस्त केलं आहे. सध्या नवीन बिल ग्राहकाला पाठवलं जात आहे.