नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे. पहिल्या वाढदिवशीच बाळ देवाघरी गेल्य़ाची हृदयद्रावक घटना घडली आहे. घरात पार्टीची जंगी तयारी सुरू असतानाच बाराव्या मजल्यावरून चिमुकला खाली पडल्याची घटना समोर आली आहे. आईवडील आणि घरच्यांचं लक्ष नसताना मुलगा घरातून बाहेर आला आणि बाराव्या मजल्यावरून खाली कोसळला या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बाळाच्या आईवडिलांवर आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडातील कासा ग्रीन वन हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या सत्येंद्र कसाना यांचा एक वर्षाचा मुलगा रिवान कसाना याचा पहिला वाढदिवस होता. ते इमारतीच्या बाराव्या मजल्यावर राहतात. घरात खेळणारा हा रिवान सर्वांचा डोळा चुकवून घराच्या बाहेर पडला. बाहेर गेल्यानंतर जिन्याजवळ लावलेल्या रेलिंगमधून तो बाराव्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर जाऊन पडला.
रिवान कसाना याचा यामध्ये मृत्यू झाला. रिवानचा पहिला वाढदिवस असल्याने घरामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण होतं. कुटुंबीय घरात पार्टीची जंगी तयारी करत होते. सजावट सुरू होती. अनेक पाहुणे मंडळी खास वाढदिवसासाठी आली होती. अनेकजण खूप दिवसांनी एकत्र आल्यामुळे सगळेच गप्पांमध्ये रमले होते. तर बाळाचे आईवडील देखील कामात व्यस्त होते. याच दरम्यान ही दुर्घटना घडली. पहिल्या वाढदिवसच रिवानचा शेवटचा वाढदिवस ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बर्थ डे पार्टी जीवावर बेतली; डीजेच्या हादऱ्याने इमारत कोसळली
उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. भयंकर बाब म्हणजे डिजेच्या हादऱ्याने इमारत कोसळल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तब्बल 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ताजगंजमधील सोनू वर्मा यांच्या घरी त्यांचे मित्र अनिकेत चौधरी यांच्या बर्थ डे पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी अनेक लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. वाढदिवसासाठी लावलेल्या डीजेच्या आवाजाच्या धक्क्याने किंवा त्या गाण्यांच्या तालावर नाचणाऱ्या लोकांच्या वजनामुळे घराचं छप्पर कोसळलं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.