नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. आता गौतम बुद्ध नगर प्रशासनाने नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या शाळाही बंद केल्या आहेत. प्रदूषणामुळे शाळा तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील शाळांना ७ ते १० नोव्हेंबरपर्यंत सुट्टी राहणार आहे.
शाळा प्रशासनाने मुलांना ऑनलाइन क्लासेसद्वारे शिकवावे, असे आदेश नोएडाच्या डीएमने दिले आहेत. १० नोव्हेंबरपर्यंत शाळा तात्काळ बंद करण्यात आल्या आहेत. विषारी हवेमुळे दिल्ली एनसीआरमधील लोकांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यात जळजळ होणे आणि घसा खवखवणे अशा तक्रारींचा सामना करावा लागत आहे. सोमवारी दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, फरीदाबादसह एनसीआरच्या सर्व भागात प्रदूषणाची पातळी गंभीर असल्याचे दिसून आले.
दिल्लीतील प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्लीत पाचवीपर्यंतच्या सर्व शाळा बंद राहतील. दिल्ली सरकारने वाढत्या प्रदूषणाबाबत निर्णय घेतला आहे. दिल्लीचे शिक्षण मंत्री आतिशी यांनी ट्विटरवर लिहिले होते की, प्रदूषणाची पातळी कायम आहे, त्यामुळे दिल्लीतील प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील. शाळांना इयत्ता ६वी आणि १२वीसाठी ऑनलाइन वर्ग घेण्यास सांगितले आहे.
आकडेवारीनुसार, दिल्ली-एनसीआरमधील सर्वात चिंताजनक परिस्थिती नोएडामध्ये आहे, जिथे सोमवारी सकाळी ८.३०च्या सुमारास एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) ६१६ नोंदवण्यात आला. वाढत्या प्रदूषणादरम्यान, कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) ने ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लानचा चौथा टप्पा अर्थात GRAP दिल्ली-NCR मध्ये लागू केला आहे. त्याअंतर्गत दिल्लीत बांधकामांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. कचरा जाळण्यावर लक्ष ठेवले जात आहे.