नवी दिल्ली: प्रदूषण आणि खराब हवामानामुळे दोन दिवस नोएडातील शाळा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. गौतम बुद्ध नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे.
नोएडा परिसरातील सर्व खासगी आणि सरकारी शाळा दि. ४ आणि ५ नोव्हेंबरला बंद राहतील. बारावीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. आज सकाळीही नोएडाचा एअर क्वॉलिटी इंडेक्स ६६७ एक्यूआय असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्लीमध्येप्रदूषणाने कमाल पातळीही ओलांडली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये ५ नोव्हेंबरपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास ईपीसीएने मनाई केली आहे. यासंदर्भात या संस्थेचे अध्यक्ष भुरेलाल यांनी दिल्ली, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दिल्ली, एनसीआर या भागांमध्ये प्रदूषणाने अतिधोकादायक स्तराची पायरीही ओलांडली आहे. त्यामुळे दिल्ली, फरिदाबाद, गुरुग्राम, गाझियाबाद, नॉयडा, ग्रेटर नॉयडा या भागांतील बांधकामे, हॉट मिक्स प्लांट, स्टोन क्रशर येत्या काही दिवसांपर्यत बंद ठेवण्यात यावे अशी विनंती देखील भुरेलाल यांनी केली आहे.