"मंदिरांमधील लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदूषण वाढते"; IAS अधिकाऱ्याच्या पोस्टमुळे गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 11:28 AM2024-10-22T11:28:45+5:302024-10-22T11:33:58+5:30
सध्या मध्य प्रदेशात मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर वाजवण्यावरुन जोरदार वाद सुरू आहे.
IAS Shailbala Martin :मंदिरांमध्ये लावलेल्या लाऊडस्पीकरबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या वक्तव्यावरून मध्य प्रदेशात वाद वाढला आहे. मध्य प्रदेश सरकारच्या चर्चेतल्या आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन या पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. शैलबाला मार्टिन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मंदिरांमध्ये लावलेल्या लाऊडस्पीकरबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. शैलबाला मार्टिन यांनी केलेल्या पोस्टमुळे नवा वाद सुरू झाला आहे. हिंदू संघटनांनी या विधानाला विरोध केला आहे. तर काँग्रेसने हा न्यायप्रश्न असल्याचे म्हटले आहे.
भोपाळमध्ये दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या वेळी एका १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर, लाऊडस्पीकरवरून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर सोशल मीडियावर वाद सुरू झाला. हा मुलगा डीजेच्या तालावर नाचत असताना अचानक बेशुद्ध होऊन शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मध्य प्रदेश पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेने लाऊडस्पीकरबाबतही वाद सुरू झाला आहे.
शैलबाला मार्टिन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत मंदिरांवर लावलेले लाऊडस्पीकर ध्वनी प्रदूषण पसरवतात, असं म्हटलं आहे. महिला आयएएस अधिकाऱ्याच्या विरोधात धार्मिक संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. मध्य प्रदेशमधील ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावर सोशल मीडियावर चर्चा करताना एका युजरने मशिदींवरील लाऊडस्पीकरवरुन प्रश्न उपस्थित केला. या लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदुषण होत असून मुस्लिम समाजाने हे लाऊडस्पीकर काढून टाकावे, असे म्हटलं होतं. या पोस्ट प्रत्युत्तर देताना, शैलबाला मार्टिन यांनी मंदिरांवर लावलेले लाऊडस्पीकर ध्वनी प्रदूषण पसरवत असल्याचे म्हटलं.
"मग मंदिरावरील लाऊड स्पीकरचं काय? या लाऊड स्पीकरमुळेही मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतं. मंदिरांवरील लाऊड स्पीकर मध्यरात्रीपर्यंत वाजतात, तेव्हा कुणाला त्रास होत नाही का?," असे शैलबाला मार्टीन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हिंदुत्व संघटना संस्कृती बचाओ मंचचे प्रमुख चंद्रशेखर तिवारी यांनी शैलबाला मार्टीन यांच्या विधानावर नापसंती दर्शवली आहे. आपण शैलबाला मार्टीन यांचा निषेध करणार असल्याचे सांगितले. "मंदिरांमध्ये अजानसारख्या लाऊडस्पीकरवर ५ वेळा नव्हे तर मधुर आवाजात आरती आणि मंत्रांचे पठण केले जाते. एवढेच नाही तर मोहरमच्या मिरवणुकीत कोणी दगडफेक केल्याचे पाहिले आहे का. पण हिंदूंच्या यात्रांवर अनेकदा दगडफेक झाली आहे. त्यामुळे माझं त्यांना इतकंच सांगणं आहे की त्यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावू नये. त्यांना हा अधिकार नाही," असा सवाल चंद्रशेखर तिवारी यांनी केला.
दुसरीकडे, काँग्रेसचे प्रवक्ते अब्बास हाफीज यांनी याचे समर्थन केले आहे. आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन यांनी योग्य प्रश्न उपस्थित केला आहे. भाजप सरकारच्या लाऊडस्पीकरविरोधातील पक्षपाती कारवाईवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रश्न उपस्थित केले आहेत, असं अब्बास हाफीज म्हणाले.