नवी दिल्ली : राजधानीत अधिकार क्षेत्रावरून आम आदमी पार्टीचे (आप)सरकार आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यादरम्यान रण पेटले असतानाच या संघर्षात होरपळल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नोकरशहांनी यात उडी घेतली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रधान सचिव (सेवा) पदावरून हटविलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी अरिंदो मजुमदार यांनी आप सरकारवर लक्ष्य साधत आम्ही असंवैधानिक आदेशांचे पालन करणार नाही असे खडसावून सांगितले.दरम्यान आयएएस आॅफिसर्स असोसिएशनने या वादात उडी घेतल्यामुळे सत्तारूढ आम आदमी पार्टी संतापली आहे. ‘केंद्राकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पदोपदी अवमान होत असताना आणि त्यांना हटविले जात असताना आयएएस आॅफिसर्स असोसिएशन मात्र कुंभकर्णासारखी झोपली होती का?’ अशा शब्दात ‘आप’चे नेते आशुतोष यांनी असोसिएशनवर हल्लाबोल केला.अधिकाऱ्यांची बैठकअरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम, केंद्रशासित प्रदेशांच्या तुकडींमधील शंभरावर आजी आणि माजी सनदी अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी रात्री येथे पार पडली. या बैठकीत मजुमदार यांनी आप सरकारवर कडाडून हल्ला चढविला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. नायब राज्यापालांच्या निर्देशानुसार शकुंतला गामलीन यांची हंगामी मुख्य सचिवपदी नियुक्तीसंबंधी आदेश काढल्यामुळे केजरीवाल यांनी गेल्या शनिवारी मजुमदार यांना पदावरून हटविले होते. नंतर नायब राज्यपालांनी त्यांना हटविण्याचा निर्णय अमान्य केला. यावर आप सरकारने सोमवारी त्यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकून त्यांना काम करण्यापासून रोखले होते.ट्रान्सफर/पोस्टिंग उद्योग बंद करण्याचा ‘आप’ सरकारचा प्रयत्न-सिसोदियादिल्लीतील अधिकारी ट्रान्सफर/पोस्टिंग उद्योग चालवित आहेत आणि ‘आप’ सरकारला हा उद्योग बंद करायचा आहे, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे. आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीबद्दल अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर सिसोदिया यांनी हे वक्तव्य केले. ते पत्रकारांशी बोलत होते.सिसोदिया म्हणाले, ‘याआधीच्या सरकारमध्ये ट्रान्सफर/पोस्टिंग उद्योग चालविणारे अधिकारी निवृत्तीनंतर आता आयएएस अधिकाऱ्यांना प्रेरणा देत आहेत. हे मोठे रोचक आहे. दिल्लीत ट्रान्सफर/पोस्टिंग हा मोठा उद्योग आहे आणि गेल्या तीन महिन्यात आम्ही हा उद्योग बंद केला आहे. सर्व बदल्या ह्या पात्रतेच्या आधारावर आणि प्रामाणिकपणे करण्यात आल्या आहेत आणि याच कारणामुळे लोक आमचा विरोध करीत आहेत. दिल्लीत ट्रान्सफर/पोस्टिंग उद्योगातून कोट्यवधी रुपये जमविण्यात आले आहेत.’
दिल्लीतील रणात नोकरशहांची उडी
By admin | Published: May 21, 2015 11:44 PM