B S Yediyurappa ( Marathi News ) :कर्नाटकातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. POCSO प्रकरणात बेंगळुरू न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. काल सीआयडीने येडियुरप्पा यांना लैंगिक छळ प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र ते सीआयडीसमोर हजर झाले नाहीत. अटकेच्या भीतीने येडियुरप्पा यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती.
अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात
१७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून पोक्सो कायद्यानुसार खटला चालवला जात आहे. लैंगिक छळ प्रकरणी सीआयडीने बुधवारी माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना चौकशीसाठी बोलावले. येडियुरप्पा यांच्या वकिलांनी सीआयडीसमोर हजर राहण्यासाठी एका आठवड्याची मुदत मागितली. पण, आज गुरुवारी बंगळुरू न्यायालयाने बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले.
मुलीच्या आईने १४ मार्च रोजी सदाशिवनगर पोलिस ठाण्यामध्ये येडियुरप्पा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध POCSO आणि कलम 354A अंतर्गत गुन्हा दाखल केला. "ही घटना २ फेब्रुवारी रोजी घडली, तेव्हा ते एका प्रकरणात मदतीसाठी येडीयुरप्पा यांच्या घरी गेले होते", असा आरोप मुलीच्या आईने केला आहे.
माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. यात त्यांनी म्हटले की, कारण हा खटला रद्द करण्यात यावा, कारण त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा सिद्ध करण्यासारखे काहीही नाही.
तपासात पूर्ण सहकार्य केले
येडियुरप्पा म्हणाले की, २८ मार्च रोजी दिलेल्या नोटीसनुसार मी सुनावणीला हजर राहिलो आणि तपासात पूर्ण सहकार्य केले, मात्र पुन्हा १२ जून रोजी दिलेली नोटीस काल माझ्यापर्यंत पोहोचली. पक्षाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे यावेळी मी सुनावणीला उपस्थित राहू शकत नाही. १७ जून रोजी होणाऱ्या सुनावणीला मी स्वतः उपस्थित राहीन. यापूर्वीही मी तपासात सहकार्य केले आहे. काही कारणांमुळे मी यावेळी तपासात सहभागी होऊ शकत नाही.