पुदुचेरीमध्ये निवडणूक न घेणारे लाेकशाहीचे धडे देतात; पंतप्रधान माेदींचे राहुल गांधींना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 12:37 AM2020-12-27T00:37:54+5:302020-12-27T07:07:03+5:30
काश्मिरातील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत याेजनेंतर्गत ‘सेहत’ या जन आराेग्य याेजनेचा माेदींनी व्हिडीओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून शुभारंभ केला.
नवी दिल्ली : पंतप्रधानांनी देशातील लाेकशाही संपविली असून, त्यांच्याविराेधात बाेलणाऱ्यांना दहशतवादी ठरविले जात असल्याच्या आराेपांवर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी जाेरदार प्रत्युत्तर दिले आहे. मला लाेकशाही शिकविणाऱ्या लाेकांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पुदुचेरीमध्ये ग्रामपंचायत निवडणूक घेतलेली नाही. उलट जम्मू आणि काश्मीरमध्ये लाेकशाही पद्धतीने जिल्हा विकास परिषद निवडणूक यशस्वीपणे पार पाडून दाखविल्याचा टाेला पंतप्रधान माेदींनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना लगावला.
काश्मिरातील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत याेजनेंतर्गत ‘सेहत’ या जन आराेग्य याेजनेचा माेदींनी व्हिडीओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून शुभारंभ केला. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. माेदी म्हणाले, दिल्लीत काही जण टीका करतात. मला लाेकशाहीचे धडे देत राहतात. त्यांना आठवण करून द्यायची आहे.
केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर आम्ही वर्षभरातच जिल्हा विकास परिषदेची निवडणूक पारदर्शकपणे पार पाडून दाखविली. देशात लाेकशाही किती बळकट आहे, हे दाखवून दिले. काँग्रेसशासित पुदुचेरीमध्ये सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पंचायत आणि न.प. निवडणुका झालेल्या नाहीत.