बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी वक्फ कायद्यातील सुधारणा, वक्फ मालमत्तेचा वापर आणि त्यावरील अधिकारांसंदर्भात मोठे विधान केले आहे. यासंदर्भात त्यांनी आपले मत मांडले आहे. वक्फ मालमत्तेचा वापर गरजू लोकांसाठी व्हायला हवा. तसेच वक्फच्या मालमत्तेवर गरीब मुस्लीम आणि बिगर मुस्लीम या दोघांचाही बरोबरीचा अधिकार आहे, असे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटले आहे. ते शनिवारी पाटणा येथे पत्रकारांशी बोलत होते.
वक्फचा वापर धार्मिक कार्यांसाठी आणि जनकल्याणासाठी व्हावा -आरिफ मोहम्मद खान म्हणाले, ते जेव्हा उत्तर प्रदेशात मंत्री होते, तेव्हा त्यांच्याकडे वक्फ विभाग होता. या काळात, ते वक्फ मालमत्तांसंदर्भात प्रलंबित प्रकरणे असलेल्या अनेक लोकांना भेटले. ते म्हणाले, वक्फचा अर्थ, आपली मालमत्ता अल्लाहची मालमत्ता म्हणून घोषित करणे. यावेळी त्यांनी प्रश्न केला की, अल्लाहच्या मालमत्तेचा वापर कुणासाठी आणि कोणत्या कामांसाठी व्हायला हवा? यावर त्यांनी स्वतःच उत्तर दिले की, याचा वापर धार्मिक कार्यांसाठी आणि जनकल्याणासाठी व्हायला हवा." याच बरोबर, "वक्फ करणारी व्यक्ती एखाद्या विशिष्ट समुदायाची असू शकते, मात्र वक्फचा लाभ प्रत्येकाला मिळायला हवा. मग तो कोणताही धर्माचा असो," असेही आरिफ मोहम्मद खान म्हणाले.
'फकीर' आणि 'मिस्कीन' दोघांचाही "वक्फ संपत्तीवर बरोबरीचा अधिकार - पुढे बोलताना राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी कुराणमधील एका 'आयती'चाही उल्लेख केला. ते म्हणाले, "यात गरीब आणि कमकुवत लोकांसाठी दोन शब्द वापरण्यात आले आहेत. एक फकीर (मुस्लीम) आणि दुसरा मिस्कीन (बिगर मुस्लीम). तर विचारण्यात आले की, हे दोन का आहेत? तेव्हा सांगण्यात आले की, फकीर आहे जो निर्धन आहे मुस्लीम आणि मिस्किन आहे, जो बिगर मुस्लीम आहे. दोघांचाही बरोबरीचा अधिकार आहे."
पाटण्यात किती वक्फ मालमत्ता आहेत आणि त्यापैकी किती रुग्णालये किंवा अनाथाश्रम चालवत आहेत? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.