नवी दिल्ली - अहिंसेचे पूजारी असलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी रेल्वेमध्ये प्रवास करताना आता तुम्हाला शाकाहारी जेवणावरच समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत. गांधी जयंती दिवशी रेल्वेमध्ये मांसाहारी जेवण देण्यात येऊ नये अशी शिफारस रेल्वे मंत्रालयाने सरकारला केली आहे. 2018-19 हे वर्ष महात्मा गांधींजींच्या जन्माचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त केंद्र सरकारकडून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. या दरम्यान रेल्वेमंत्रालयाने गांधी जयंती हा दिवस स्वच्छता दिनासोबतच शाकाहार दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी केली आहे. गांधीजी स्वत: शाकाहारी होते. त्यांना मांसाहाराचा तिटकारा होता. शाकाहारी होऊन हिंसा टाळली पाहिजे, असे त्यांचे मत होते, असे कारण समोर करत रेल्वेने पुढची तीन वर्षे गांधी जयंती दिवशी रेल्वेमध्ये मांसाहार देण्यात येऊ नये, असे म्हटले आहे. तसेच गांधी जयंती दिवशी गांधीजींच्या विचारांचा संदेश देणाऱ्या गाड्या चालवण्यात याव्यात, दांडी येथील सत्याग्रहाची आठवण म्हणून एक विशेष गाडी सोडावी, असा प्रस्तावही रेल्वेने पाठवला आहे. दरम्यान, केंद्राकडून हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे.
आता रेल्वेमध्ये गांधी जयंती दिवशी मिळणार नाही मांसाहारी जेवण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 6:47 PM