नागपूर : ‘जेएनयू’मधील (जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना, काळानुरुप शुल्कवाढ करणे अयोग्य नाही. मात्र गरीब विद्यार्थ्यांना यातून निश्चितच सवलत मिळायला हवी. सधन घरांमधील विद्यार्थ्यांनी हे वाढीव शुल्क भरण्यास तर काहीच हरकत नाही, असे मत ‘सुपर-३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनी व्यक्त केले.‘जेएनयू’मध्ये विद्यार्थी राजकारण असणे वाईट नाही, परंतु त्याची पद्धत योग्य हवी. तसेच ‘जेएनयू’मधील वाद शमविण्यासाठी सरकार, विद्यापीठ प्रशासन व विद्यार्थ्यांनी एकत्रित बसायला हवे, असे देखील ते म्हणाले.सातव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शिक्षण परिषदेसाठी ते नागपुरात आले होते. यावेळी ‘लोकमत’शी त्यांनी संवाद साधला. विद्यापीठांमधील राजकारणाचे ध्येय हे सकारात्मक असले पाहिजे. तेथे वास्तविक राजकारण होता कामा नये. गरजू व योग्य विद्यार्थ्यांपर्यंत सुलभ शिक्षण कसे पोहोचेल यासाठी प्रयत्न व्हावेत. जर एखाद्या विद्यापीठात शुल्क वाढवावे लागलेच तर सरकारने गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केल्या पाहिजेत.कोचिंग क्लासेसवर लगाम लावणे शक्यच नाहीदेशभरात कोचिंग क्लासेसचे पीक फोफावले आहे. अनेक जण केवळ गल्लाभरुपणा करत आहेत. या क्लासेसवर लगाम लावणे शक्य नाही. मात्र यांचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारने शासकीय शाळांना मजबूत करुन तेथे सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. शिक्षकांसाठीदेखील विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले पाहिजेत. कोचिंग क्लासेसला समांतर व्यवस्था शाळांतूनच उभी राहिली पाहिजे, असे मत आनंद कुमार यांनी व्यक्त केले.
'सधन घरातील विद्यार्थ्यांनी वाढीव शुल्क भरावे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 01:51 IST