नवी दिल्ली : जुलैमध्ये जास्त पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर मान्सून हंगामाच्या उत्तरार्धात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशात सामान्य पाऊस होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने सोमवारी व्यक्त केली.
पूर्व मध्य भारत, पूर्व आणि ईशान्य प्रदेशातील काही भाग व हिमालयाच्या बाजूने बहुतेक उपविभागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल. वायव्य आणि मध्य भारताच्या पश्चिम भागात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे, असे आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
आमूलाग्र बदल- जुलैमध्ये भारतात १३ टक्के जास्त पावसाची नोंद झाली असताना, देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागात १९०१ नंतर महिन्यातील तिसरा सर्वांत कमी पाऊस पडला, असे विभागाने म्हटले आहे. वायव्य भारतात २००१ पासून जुलैमध्ये सर्वाधिक पावसाची (२५८.६) नोंद झाली. - पावसात आमूलाग्र बदल पाहिला. जूनमधील नऊ टक्के तूट ते जुलैमध्ये १३ टक्के जास्त पाऊस झाला. - देशात आतापर्यंत मान्सून हंगामात सरासरी ४४५.८ मिमी पावसाच्या तुलनेत ४६७ मिमी पावसाची नोंद झाली जी ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.