Norovirus : केरळमध्ये नोरोव्हायरसची दहशत, 2 लहान मुलांना लागण; जाणून घ्या, लक्षणं, कशी घ्यायची काळजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 10:23 AM2022-06-06T10:23:53+5:302022-06-06T10:43:24+5:30

Kerala Norovirus : केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी लहान मुलांमध्ये संसर्ग आढळला आहे त्या ठिकाणचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

norovirus possible outbreak in kerala india how dangerous is this virus symptom precaution | Norovirus : केरळमध्ये नोरोव्हायरसची दहशत, 2 लहान मुलांना लागण; जाणून घ्या, लक्षणं, कशी घ्यायची काळजी?

Norovirus : केरळमध्ये नोरोव्हायरसची दहशत, 2 लहान मुलांना लागण; जाणून घ्या, लक्षणं, कशी घ्यायची काळजी?

Next

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता केरळमध्ये आणखी एका नव्या व्हायरसची एन्ट्री झाली असून त्याने प्रशासनाची झोप उडवली आहे. नोरोव्हायरस असं या व्हायरसचं नाव आहे. केरळमधील दोन लहान मुलांमध्ये हा व्हायरस आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, आरोग्य विभाग परिस्थितीचे आकलन करत आहे, काळजी करण्याची गरज नाही. मुलांची प्रकृती स्थिर आहे. नोरोव्हायरस हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे, जो सामान्यतः दूषित पाणी, दूषित अन्न आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो.

तिरुवनंतपुरमच्या विहिंजममध्ये नोरोव्हायरसचा नवीन संसर्ग समोर आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी लहान मुलांमध्ये संसर्ग आढळला आहे त्या ठिकाणचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. लोअर प्रायमरी स्कूलमधील दोन विद्यार्थ्यांमध्ये हा संसर्ग आढळून आला आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, शाळांमध्ये वाटण्यात येणारे माध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याचे दिसून येते. राज्याचा आरोग्य विभाग आणि सामान्य शिक्षण व नागरी पुरवठा विभागाने रविवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या. यामध्ये माध्यान्ह भोजन तयार करताना स्वच्छतेची विशेष काळजी घेणे, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, कर्मचाऱ्यांना जागरुक करणे यांचा समावेश आहे.

नोरोव्हायरस सामान्यतः दूषित पाणी, दूषित अन्न आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो. त्याची सुरुवातीची लक्षणे म्हणजे उलट्या आणि जुलाब, जे व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी सुरू होतात. रुग्णाला उलट्या झाल्यासारखे वाटते आणि ओटीपोटात दुखणे, ताप, डोकेदुखी आणि शरीर दुखणे जाणवते. हा व्हायरस एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा त्याचा बळी बनवू शकतो कारण त्याचे अनेक प्रकार आहेत. या व्हायरसवर जंतुनाशक देखील काम करत नाहीत आणि 60 अंश तापमानातही तो जिवंत राहू शकतो. म्हणजे पाणी उकळून किंवा क्लोरीन टाकून हा व्हायरस मारला जाऊ शकत नाही. हँड सॅनिटायझरचा वापर करूनही हा व्हायरस जिवंत राहू शकतो.

सहसा हा संसर्ग जीवघेणा नसतो, परंतु मुले आणि वृद्धांना विशेषतः सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. संसर्ग आणि अति उलट्या आणि जुलाबामुळे त्यांची स्थिती गंभीर होऊ शकते. बहुतेक रुग्ण काही दिवसात बरे होतात. या व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीला कोणतेही विशिष्ट औषध दिले जात नाही. हे टाळण्यासाठी, शौचालय वापरल्यानंतर किंवा डायपर बदलल्यानंतर आपले हात साबणाने वारंवार धुवा. जेवण करण्यापूर्वी किंवा अन्न तयार करण्यापूर्वी हात काळजीपूर्वक धुवावेत. गेल्या वर्षीही केरळमध्ये हा व्हायरस पसरला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: norovirus possible outbreak in kerala india how dangerous is this virus symptom precaution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.