नवी दिल्ली: एका नवीनअभ्यासानुसार २००२ ते २०२१ दरम्यान उत्तर भारतात भूजल सुमारे ४५० घन किलोमीटरने घटले असून, हवामान बदलामुळे येत्या काही वर्षांत भूजल पातळी आणखी कमी होण्याची भीती एका अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे.
आयआयटी गांधीनगर येथील अभियांत्रिकी आणि भू-विज्ञान विभागाचे प्रमुख आणि विक्रम साराभाई केंद्राचे प्राध्यापक, संशोधक विमल मिश्रा यांनी सांगितले की, भूजल संसाधनांवर दबाव आणखी वाढेल, असे अभ्यासात असे दिसून आहे.
भूजलाचे फेरभरण होण्यासाठी आम्हाला पाऊस कमी तीव्रतेचा, परंतु अधिक दिवस पडण्याची गरज आहे, सिंचनासाठी पाण्याची वाढती मागणी आणि भविष्यात भूजल फेरभरण कमी झाल्याच्या एकत्रित परिणामामुळे आधीच वेगाने कमी होत असलेल्या संसाधनावर अधिक ताण येऊ शकतो - विमल मिश्रा, संशोधक, आयआयटी गांधीनगर
पाऊस घटला, हिवाळा उबदार
उपग्रह डेटा आणि अभ्यासावरून संशोधकांना आढळले की संपूर्ण उत्तर भारतात मान्सून (जून ते सप्टेंबर) पर्जन्यमान १९५१-२०२१ दरम्यान ८.५ टक्के कमी झाले आहे. तसेच, याच काळात देशातील हिवाळा ऋतू ०.३ अंश सेल्सिअस अधिक उष्ण झाला आहे.
कोरड्या मान्सूनमुळे पावसाच्या कमतरतेच्या कालावधीत पिके टिकवून ठेवण्यासाठी भूजलावर अधिक अवलंबून राहावे लागते. पावसाळ्यात तर उबदार हिवाळ्यामुळे भूजल फेरभरणात सुमारे ६ ते १२ टक्क्यांनी मोठी घट होईल, असा अंदाज आहे. हे संशोधन 'अर्ब्स फ्यूचर' या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.
असा येतो भूजलावर दबाव
हैदराबादस्थित राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेच्या (एनजीआरआय) संशोधकांच्या चमूने अभ्यासात म्हटले आहे की, पावसाळ्यात कमी पाऊस आणि उबदार हिवाळ्यामुळे सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढेल आणि भूजल फेरभरण कमी होईल. याम यामुळे उत्तर भारतातील आधीच कमी होत असलेल्या भूजल संपत्तीवर आणखी दबाव येईल.