तिरुवनंतपुरम- उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनच्या युद्धखोरीच्या भाषेमुळे संपूर्ण जगावर चिंतेचे सावट आहे पण केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन मात्र उत्तर कोरियाच्या प्रेमात आहेत. अमेरिकेच्या दबावापुढे न झुकल्याबद्दल मंगळवारी पिनरायी विजयन यांनी उत्तर कोरियाचे कौतुक केले. उत्तर कोरिया अत्यंत कठोरपणे अमेरिकाविरोधी अजेंडा राबवत आहे.
उत्तर कोरियाने आतापर्यंत यशस्वीपणे अमेरिकेच्या दबावाचा सामना केला आहे असे विजयन म्हणाले. कोझीकोडो येथील जिल्हा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. उत्तर कोरियाच्या अणवस्त्र कार्यक्रमावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. अमेरिकेचा प्रखर विरोध असतानाही डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून उत्तर कोरियाने आतापर्यंत 20 वेळा क्षेपणास्त्र चाचणी केली आहे.
किम संपूर्ण जगामध्ये खलनायक असला तरी केरळमध्ये डाव्या आघाडीचे कार्यकर्ते त्याचे समर्थन करतात. काही दिवसांपूर्वी किम जोंग उनला मार्क्सवादी पार्टी ऑफ इंडियाने आपल्या पोस्टरवर झळकवले होते. केरळमधील नेडुमकांडम येथे होणाऱ्या माकपाच्या बैठकीसाठी लावलेल्या पोस्टरवर थेट किम जोंग उन झळकल्याने याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
तिरुवनंतरपूरमपासून 200 किमी अंतरावर असेल्या इडुक्की जिल्ह्यातील नेडुमकांडम येथे हे पोस्टर लावले होते. हे पोस्टर काही वेळातच सोशल मीडियावर पसरले आणि माकपावर चहूबाजूंनी टीका सुरु झाली. हे गाव एम.एम मणि या मंत्र्यांच्या मतदारसंघातील आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या पोस्चरचा फोटो ट्वीट करुन माकपावर टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, "
माकपाच्या पोस्टरवर किम जोंग उनला स्थान मिळाले आहे. केरळचे रुपांतर विरोधकांची हत्या करुन संपवण्याच्या प्रदेशात रुपांतर करण्याच्या त्यांच्या कार्यामुळे यात फारसे काही नवे नाही. आपल्या भयानक अजेंडाबरोबर माकपा आता रा.स्व.संघ आणि भाजपाच्या कार्यालयांवर क्षेपणास्त्र डागण्याचा विचार सुरु नसावा ही अपेक्षा.