इंफाळ- ईशान्य भारताचा उर्वरीत भारताशी संपर्क अधिकाधिक वाढविण्यासाठी 'उडान' योजनेचा उपयोग आता केला जाणार आहे. ईशान्य भारतात या योजनेंतर्गत 92 नवे हवाई मार्ग अस्तित्त्वात येतील अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्ट केले.
जानेवारी महिन्यापासून दिल्ली आणि इंफाळमध्ये आठवड्यातून दोनदा एअर इंडियाचे विमान सेवा पुरवेल तसेच मागणी वाढल्यास ही सेवा दररोज पुरवली जाईल असेही सिन्हा यांनी सांगितले. इंडिगो विमानकंपनी आपली सेवा गुवाहाटी ते सिल्चर आणि ऐजॉल अशी सुरु करेल त्याचप्रमाणे अत्यंत लहान हवाईपट्टीवर उतरू शकतील अशी नऊ-दहा आसनांची सीप्लेनस स्पाईसजेट विमानकंपनी सुरु करत असल्याची माहिती सिन्हा यांनी दिली. स्पाईसजेट अशा प्रकारची विमाने खरेदी करत आहे, त्यामुळे ईशान्य भारताशी संपर्क वाढेल.
ईशान्य भारत विकास परिषदेमध्ये जयंत सिन्हा या नव्या मार्गांबाबत बोलत होते. इंडिया फाऊंडेशन ही संस्था आणि मणिपूर सरकारतर्फे ही परिषद आयोजीत करण्यात आली होती. ते पुढे म्हणाले, "सिक्कीममधील पाकयोंग विमानतळ आता पूर्ण होत असून त्यामुळे नथू ला पाहण्यासाठी जाणारे आणि सिक्किमच्या उत्तर भागात जाणारे पर्यटक त्याचा वापर करु शकतील. मणिपूरमधील मोअर, आसाममधील रुप्सी, मेघालयातील तुरा अशा विमानतळांवरील वाहतूक सुरु होणार आहे." देशात विमानवाहतूक वाढविण्यासाठी, ज्या शहरांमध्ये आजवर विमानवाहतूक सुरु झाली नाही किंवा वापरात नसलेल्या विमानतळांचा वापर सुरु करणे यासाठी उडान म्हणजे उडे देशका हर नागरिक ही योजना केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गतच देशामध्ये हवाई वाहतूक वाढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.