नवी दिल्ली : काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये ३.९ अंश सेल्सिअस एवढे यंदाचे नीचांकी तापमान नाेंदविण्यात आले असून, हिमाचल प्रदेशात पारा उणे १२.१ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. हिमालयाकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राजधानी गारठली आहे. दिल्लीतील कमाल तापमान १५.२ अंशांपर्यंत घसरले हाेते. काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगरमध्ये पारा उणे सहा अंशांपर्यंत घसरला. पहलगाममध्येही पारा उणे ९.५ अंशांवर घसरला आहे. जाेरदार बर्फवृष्टीमुळे काश्मीरमध्ये सर्वत्र बर्फाची चादर ओढल्याचे चित्र दिसत आहे. या भागात साेमवारनंतर तुरळक बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हिमाचल प्रदेशातील केलाँग येथे उणे १२.१ अंश सेल्सिअस तापमान नाेंदविण्यात आले. राज्यात अनेक ठिकाणी पारा शून्याच्या खाली घसरला आहे. हरियाणा आणि पंजाबमध्येही कडाक्याची थंडी पडली आहे.
उत्तर भारतात पारा घसरला शून्याखाली, दिल्लीत ३.९ अंश सेल्सिअस नीचांकी तापमान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 1:55 AM