लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फ्रेबुवारी २०२४ रोजी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. त्यांचा हा सलग सहावा अर्थसंकल्प असेल. यात शेतकऱ्यांना दिला जाणारा सन्मान निधी दोन हजारांनी वाढविला जाण्याची शक्यता आहे.
सध्या या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवून ८ हजार केली जाऊ शकते. सध्या सन्मान निधी वर्षभरात तीन हफ्त्यांमध्ये दिला जातो. दर चार महिन्यांनी २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातात. मोदी सरकारच्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात या सन्मान निधीचा १५ वा हप्ता जमा केला होता. केंद्र सरकारची ही सर्वांत मोठी योजना आहे. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू करण्यात आली. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीत वाढ केली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.
लोकप्रिय अर्थसंकल्प मांडणार? आगामी वर्षात देश लोकसभा निवडणुकांना सामोरा जात आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून मांडण्यात येणारा हा अर्थसंकल्प अंतरिम असेल. निवडणुकीनंतर निवडून आलेले सरकार उरलेल्या आर्थिक वर्षाचा लेखानुदान तयार करते. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांप्रमाणेच महिला, आदिवासी, आर्थिक दुर्बल घटक, उद्योगपती, कामगार आदी घटकांना काही ना काही देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. त्यामुळेच अंतरिम असला तरी या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा केल्या जातील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
११कोटी कुटुंबांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळाला आहे.
२.६० लाख कोटी रुपयांचा निधी या योजनेतून आतापर्यंत वितरित करण्यात आला आहे.