नवी दिल्ली: अत्याचाराला कंटाळून काश्मीर खोऱ्यातून गेल्या अनेक वर्षांमध्ये हजारो-लाखो काश्मिरी पंडितांनी पलायन केले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून या काश्मिरी पंडितांना सुरक्षा पुरवल्याचा दावा केला जातो. याबाबत आज केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी राज्यसभेत महत्वाची माहिती दिली.
नित्यानंद राय यांनी सांगितले की, सरकारी नोंदीनुसार 2022 मध्ये एकाही काश्मिरी पंडिताने काश्मीर खोऱ्यातून पलायन केले नाही. खोऱ्यात सध्या 6,514 काश्मीरी पंडित राहतात. 2022 मध्ये एकाही काश्मिरी पंडिताने स्थलांतर केले नसल्याचा दावा सरकारने केला आहे. सरकारने आकडेवारीसह माहिती दिली आहे. केंद्र सरकारने काश्मिरी पंडितांचा जिल्हावार तपशीलही दिला आहे. कोणत्या जिल्ह्यात किती काश्मीर पंडित राहतात हे सांगण्यात आले आहे.
जिल्हावार तपशील20 जुलै 2022 पर्यंत अनंतनागमध्ये 808 काश्मिरी पंडित राहत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, कुलगाम जिल्ह्यात सर्वाधिक 2,639 काश्मिरी पंडित राहतात. पुलवामामध्ये 579, शोपियानमध्ये 320, श्रीनगरमध्ये 455, गंदरबलमध्ये 130, कुपवाडामध्ये 19, बांदीपोरामध्ये 66, बारामुल्लामध्ये 294 आणि बडगाममध्ये 1,204 काश्मिरी पंडित आहेत.
सरकारची विशेष योजनाविशेष म्हणजे काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार आणि काश्मीर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत राज्यातील सरकारी विभागांमध्ये नियुक्त केलेल्या काश्मिरी पंडितांना सुरक्षित जिल्ह्यात तैनात केले जात आहे. मनोज सिन्हा यांनी पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशन (पीएजीडी) आणि भाजपच्या शिष्टमंडळाला कळवले होते की, खोऱ्यातील तहसील मुख्यालयावर नुकतेच झालेले दहशतवादी हल्ले पाहता, काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांची तैनाती सुरक्षित जिल्ह्यांमध्ये केली जाईल.