PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात हिंदू मुस्लिम हे मुद्दे मोठ्या प्रमाणावर गाजत आहेत. अल्पसंख्याक समाजाबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. मी अल्पसंख्याकांविरुद्ध एक शब्दही उच्चारला नाही आणि भारतीय जनता पक्ष आजच नाही तर कधीच अल्पसंख्याकांच्या विरोधात नव्हता, असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. तसेच आपण कुणालाही विशेष नागरिक मानायला तयार नाही आहोत, असेही मोदींनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसकडून होत असलेल्या आरोपांबाबतही भाष्य केलं.
रविवारी रात्री उशिरा पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी अल्पसंख्यांकांबद्दल भाष्य केलं. निवडणूक भाषणे जातीयदृष्ट्या फूट पाडणारी आणि ध्रुवीकरण करणारी नाहीत हे सर्वांनाच माहिती आहे, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं. विरोधकांकडू होत असलेली टीका पाहून पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं. काँग्रेसने संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेचा अवमान केल्याचा आरोपही पंतप्रधानांनी केला.
निवडणूक प्रचारादरम्यानच्या माझ्या भाषणांचा उद्देश व्होटबँकेचे राजकारण तसेच विरोधी पक्षांचे अल्पसंख्याकांना खूश करण्याच्या प्रयत्नांचा पर्दाफाश करणे हा आहे, असेही मोदी म्हणाले. यावेळी अल्पसंख्याकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबद्दल मोदींना मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. "मी अल्पसंख्याकांविरोधात एक शब्दही बोललो नाही. मी फक्त काँग्रेसच्या व्होट बँकेच्या राजकारणाविरुद्ध बोलतोय. काँग्रेस संविधानाच्या विरोधात काम करत आहे, मी हेच सांगत होतो," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
"बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्यासह भारतीय राज्यघटनेच्या रचनाकारांनी धर्माच्या आधारावर आरक्षण नसल्याचा निर्णय घेतला होता. आता तुम्ही त्याच्यापासून दूर जात आहात. त्यांचा खुलासा करणे ही माझी जबाबदारी आहे. त्यावेळी माझ्या पक्षाचा एकही सदस्य संविधान सभेत नव्हता. ही देशभरातील उल्लेखनीय लोकांची सभा होती," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
"त्यांचे राजकारण तुष्टीकरणाचे आहे आणि माझे राजकारण 'सबका साथ, सबका विकास'चे आहे. आमचा सर्व धर्माच्या समानतेवर विश्वास आहे. आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे. आम्ही कुणालाही विशेष नागरिक म्हणून स्वीकारायला तयार नाही. पण आम्ही सर्वांना समान मानतो," असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं.