''दारू नाही पण पत्नीला सोडू शकतो''; मद्यपी वृद्धाचे भर न्यायालयात उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 12:20 PM2019-12-24T12:20:34+5:302019-12-24T12:21:20+5:30
भोपाळच्या कौटुंबीक न्यायालयात एका 69 वर्षांच्या महिलेने तिच्या पतीविरोधात तक्रार केली आहे.
भोपाळ : मध्यप्रदेशच्या न्यायालयात नुकताच एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील न्यायालयात एका वृद्ध महिलेने पालन पोषणासाठी पतीकडून पैसे मिळण्यासाठी दाद मागितली आहे. याला उत्तर देण्यासाठी न्यायालयात गेलेला तिच्या 89 वर्षीय पतीने न्यायालयात धक्कादायक बाब सांगितली आहे. यामुळे न्यायाधीशांसह उपस्थितांनाही धक्का बसला होता.
भोपाळच्या कौटुंबीक न्यायालयात एका 69 वर्षांच्या महिलेने तिच्या पतीविरोधात तक्रार केली आहे. यामध्ये तिने उदरनिर्वाहासाठी पैसे मिळण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात न्यायाधिशांनी जेव्हा दोघांना समजाविण्याचा प्रयत्न केला तेव्हा महिलेने आयुष्याच्या उतारवयात पतीसोबत राहण्यास नकार दिला.
यावर तिला कारण विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, तिचा पती दररोज दारू पिऊन मारहाण करतो. यावर न्यायधीश आरएन चंद यांनी महिलेच्या पतीला समजाविण्याचा प्रयत्न केला. तसेच दारू सोडण्यास सांगितले. यावर या वृद्धाचे उत्तर ऐकून तेही अचंबित झाले.
मी आयुष्यभर दारू पित आलो आहे. आता जर दारू सोडली तर मरून जाईन. याआधी दोनवेळा दारू सोडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आजारी पडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले होते. तेव्हा डॉक्टरने सांगितले होते की दारू कमी कर, पण थोडी पित जा. आता दारू तेव्हाच सुटेल जेव्हा मला मरण येईल, असे या वृद्धाने न्यायाधीशांना सांगितले. याचबरोबर मी दारुसाठी पत्नीला सोडण्यास तयार असल्याचेही त्याने सांगताच उपस्थितांना धक्का बसला.
मी किरकिर करणाऱ्या पत्नीला सोडू शकतो, पण दारू नाही असे सांगत त्याने पत्नीला दर महिन्याला 10 हजार रुपये देण्याच्या निर्णयाला लगेचच होकारही देऊन टाकला.