नवी दिल्ली - आयएनएक्स प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. मात्र २७ तासांनंतर बेपत्ता झालेले पी. चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना पी. चिदंबरम यांनी आयएनएक्स प्रकरणात मी कधीही आरोपी नव्हतो. माझ्यावर कोणतंही आरोपपत्र दाखल झालं नाही असा दावा केला आहे.
यावेळी बोलताना पी. चिदंबरम यांनी सांगितले की, सीबीआय किंवा ईडीने कोणतंही आरोपपत्र दाखल केलेलं नाही, माझा मुलभूत हक्क हिरावला जातोय. मागील २७ तासांपासून अनेक भ्रम पसरविले जात आहेत. मी आणि माझं कुटुंब यात दोषी नाही. कोणत्याही आरोपपत्रात माझं नाव नाही. सुप्रीम कोर्टात याबाबत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. शुक्रवारी याबाबत सुनावणी होईल. गेल्या २७ तासांत वकिलांसोबत पुढील लढण्याची तयारी करत होतो. रात्रभर कागदपत्रे तयार केली जात होती. तपास यंत्रणांही कायद्याचं पालन केलं पाहिजे असं चिदंबरम यांनी सांगितले.
आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर चिदंबरम यांच्या चेन्नई येथील घरी सीबीआयचे पथक मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दाखल झाले होते. मात्र, चिदंबरम घरी नसल्याने सीबीआयच्या पथकास रिकाम्या हाती परतावे लागले होते. मात्र, सुत्रांनुसार सीबीआय, ईडीला चिदंबरम कुठे लपलेत या ठिकाणाची माहिती असल्याचे समोर आले आहे.
तपास संस्थांमधील सुत्रांच्या हवाल्याने एका हिंदी वृत्तसंस्थेने (अमर उजाला) ही माहिती दिली आहे. सीबीआय, ईडीला चिदंबरम यांच्या लपण्याच्या जागेचा ठावठिकाणा माहिती होता. मात्र, जाणूनबुजून ते जोरबाग येथील घरी शोधायला गेल्याचे सांगण्यात आले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार मंगळवारी चिदंबरम सर्वोच्च न्यायालयात हजर होते. तेथून निघाल्यानंतर ते जोरबाग येथील घरी गेले नाहीत. त्यांना सीबीआय, ईडी अटक करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयातून निघाल्यानंतर रस्त्यातच गाडी बदलली होती. आणि जवळपास 8 वाजेपर्यंत त्यांचा फोन सुरू होता. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला होता.