पिलीभीतचे खासदार वरुण गांधी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याच सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ते काँग्रेसमध्ये अथवा समाजवादी पक्षासोबत जाऊ शकतात, असा कयासही लावला जात आहे. मात्र यातच, आता वरुण गांधी यांचा नवा प्लॅन समोर आला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते आपला नवा पक्ष स्थापन करू शकतात, असा दावाही अनेक वृत्तांमध्ये केला जात आहे.
2024 पूर्वी करू शकतात नव्या पक्षाची घोषणा - वरून गांधी लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) पूर्वी भारतीय जनता पक्ष (BJP) सोडून आपली आई मेनका गांधी (Maneka Gandhi) यांच्यासह नव्या पक्षाची स्थापना करू शकतात. मात्र, यासंदर्भात अद्याप काहीही स्पष्ट नाही. पण, माध्यामांतील वृत्तांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने दावा केला जात आहे की वरून गांधी नवा पक्ष स्थापन करू शकतात.
काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता - नवा पक्ष तयार करण्याऐवजी वरुण गांधी (Varun Gandhi) काँग्रेस (Congress) मध्ये प्रवेश करू शकतात. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वेगळी विचारधारा म्हणत वरून यांच्या काँग्रेस प्रवेशास नकार दिला असला तरी, आता प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांची या प्रकरणात एंट्री झाली आहे. त्या वरून यांच्यासोबत बोलत आहेत. वरुण आणि प्रियंका यांचे संबंध चांगले आहेत आणि त्यांच्यात बोलणे होत असते. मात्र आता त्यांच्यात राजकीय चर्चाही होत आहेत.
हे दोन पर्यायही खुले -काँग्रेस शिवाय वरून गांधी समाजवादी पक्षातही जाऊ शकतात अथवा तिसरा पर्याय म्हणून विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवारही होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुण गांधी 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसऱ्या पर्यायावरही लक्ष देत आहेत.