"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 05:21 PM2024-10-05T17:21:33+5:302024-10-05T17:22:08+5:30
Haryana Assembly Election 2024: हरियाणात सत्तांतराची चाहूल लागलेल्या काँग्रेसमध्ये निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदासाठीची रस्सीखेच सुरू झाली आहे. राज्यात भूपेंद्र सिंह हुड्डा आणि कुमारी शैलजा यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून जुगलबंदी रंगलेली असतानाच काँग्रेसचे खासदार रणदीप सुरजेवाला यांनी आज आपल्या महत्त्वाकांक्षेबाबत सूचक विधान केलं आहे.
हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेलं मतदान काही वेळातच समाप्त होणार आहेत. त्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र राज्यात सत्तांतराची चाहूल लागलेल्या काँग्रेसमध्ये निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदासाठीची रस्सीखेच सुरू झाली आहे. राज्यात भूपेंद्र सिंह हुड्डा आणि कुमारी शैलजा यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून जुगलबंदी रंगलेली असतानाच काँग्रेसचे खासदार रणदीप सुरजेवाला यांनी आज आपल्या महत्त्वाकांक्षेबाबत सूचक विधान केलं आहे. निवडणूक लढवली नाही, याचा अर्थ सरकार चालवण्याची महत्त्वाकांक्षा नाही, असा होत नाही. तसेच मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणे गैर नाही, असेही सुरजेवाला म्हणाले.
आज हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर सुरजेवाला प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, निवडणूक लढवली नाही याचा अर्थ सरकार चालवण्याची महत्त्वाकांक्षा नाही आहे, असा होत नाही. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराकडे हरियाणामध्ये परिवर्तन आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समाधान आणण्याचा दृष्टीकोन असला पाहिजे. माझ्याकडे हरियाणाच्या विकासासाठीचा दृष्टीकोन आहे. तसेच मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणं हे काही गैर नाही, असेही सुरजेवाला यांनी सांगितले.
मात्र वैयक्तिक महत्त्वाकांक्षा ही पक्षाच्या शिस्तीपेक्षा मोठी नाही. मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे जो काही निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य असेल. हे मत मी भूपेंद्र सिंह हुड्डा, कुमारी शैलजा आणि इतरांच्यावतीनेही मांडत आहेत असेही त्यांनी सांगितले. राज्यातील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला लोक कंटाळले आहेत. शेतकरी, तरुण, पैलवान आणि जवान सर्वांची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे राज्यात क्रांतिकारी परिवर्तन दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, रणदीप सुरजेवाला पुढे म्हणाले की, माझं सर्वप्रथम प्राधान्य हे कैथलचा विकास करण्याला असेल. रणदीप सुरजेवाला हे विधानसभेची निवडणूक लढवत नसले तरी त्यांचे पुत्र आदित्य सुरजेवाला हे कैथल मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आहेत. कैथल हा सुरजेवाला कुटुंबीयांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. आदित्य सुरजेवाला यांचा सामना भाजपा आमदार लीला राम यांच्याशी होत आहे.