लखनऊ : अॅपलच्या एरिया मॅनेजरवर गोळ्या झाडल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी याने मुद्दामहून गोळी मारली नसल्याचे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी आमची तक्रारच दाखल करून न घेण्यास सांगितले आहे. आमच्या जिवाला काही किंमत नाही का, असा सवाल चौधरी याने केला आहे. तर त्याच्या पत्नीने घटनेच्या 12 तासानंतरही गुन्हा दाखल न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
अॅपलचे एरिया मॅनेजर विवेक तिवारी कंपनीचा एक कार्यक्रम आटोपून सहकाऱ्याला सोडण्यासाठी जात असताना गोमतीनगरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपी कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी आणि संदीप यांना अटक केली आहे. या प्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
मात्र, आरोपी कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी याने आपण तिवारीवर आधी गोळी झाडली नसल्याचे सांगितले. तसेच तिवारीला कार थांबविण्य़ास सांगितले मात्र त्याने कार आपल्यावर आदळवली. यानंतर तीनवेळा त्याने आपल्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. यातून त्याचा आपल्याला ठार मारण्याचा उद्देश होता. यानंतर चुकून गोळी झाडली गेली. मी याबाबत गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. मात्र, एफआयआर नोंदविण्यास नकार देण्यात आला. पोलिसांच्या जिवाची काहीच किंमत नाही का, असा सवालही चौधरीने उपस्थित केला.
तर उत्तर प्रदेशचे जलसंपदा मंत्री धर्मपाल सिंह यांनी बेजबाबदार वक्तव्य केले आहे. एन्काऊंटरमधील प्रत्येक गोळी ही गुन्हेगारालाच लागते. सामान्यांना नाही. दोषींवर कारवाई होईल, न्याय मिळेल, असे म्हटल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा वाद सुरु झाला आहे.