ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - नॅशनल हेराल्ड प्रकरणावरुन गदारोळ घालून संसदेचे कामकाज रोखून धरणा-या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नाव न घेता जोरदार टीका केली. कोणाच्या लहरीपणावर किंवा इच्छा-अनिच्छेवर लोकशाही चालत नाही. सध्या संसदेचे कामकाज ठप्प झाले आहे ही दु:खाची बाब आहे असे मोदी म्हणाले. ते दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते.
लोकशाहीला आपण निवडणूका आणि सरकारपर्यंत मर्यादीत ठेऊ शकत नाही. कोणाच्या लहरीपणावर किंवा इच्छे-अनिच्छेवर लोकशाही चालत नाही असे मोदी म्हणाले. संसदेतील गदारोळामुळे फक्त वस्तू व सेवाकर विधेयकच नव्हे तर, गरीबांच्या हिताचे अनेक निर्णय अडकून पडले आहेत. गरीबांना फायदा होईल अशी महत्वाची विधेयके प्रलंबित आहेत असे मोदी म्हणाले.
सध्या तुम्ही बघाल तर, गदारोळ वाढला आहे. मेरी मर्जी सुरु आहे. माझ्या मनात येणार ते मी करणार. देश असा चालतो का ? लोकशाही मनमंत्राने चालत नाही. तुम्ही काहीही विचार कराल पण म्हणून यंत्रणा तशी चालत नाही असे मोदी म्हणाले.