बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटक विधिमंडळाची दोन्ही सभागृहे ठराव संमत करणार असून, महाराष्ट्राला एक इंचही जमीन दिली जाणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधिमंडळ अधिवेशनात मांडली. मंगळवारी विधिमंडळ अधिवेशनात सीमा प्रश्नावर झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही सभागृहांत हा ठराव एकमताने मंजूर करण्याची सूचना करीत राज्य शासनाच्या भूमिकेचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.
मुख्यमंत्री म्हणाले, यापूर्वीही आम्ही असे अनेक ठराव मांडले आहेत आणि मंजूरही केले आहेत. सीमा प्रश्नासंदर्भात सरकारची भूमिका मांडताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत राज्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार करणारा ठराव मंजूर करू, असे ते म्हणाले. यावेळी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासह सर्वपक्षीय सदस्यांनी सहमती दर्शविली.
सिद्धरामय्या म्हणाले की, महाजन अहवाल हा अंतिम असून, या अहवालानुसार सीमा प्रश्न आधीच संपुष्टात आला आहे.